...

IndiGo प्रवाशांना अतिरिक्त शुल्क न घेता पूर्ण तिकीट रिफंड द्या – मुरलीधर मोहोळ.

पुणे : विमान उड्डाणांच्या नियोजनातील गोंधळाचा फटका बसलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांच्या तिकिटाचे पैसे तातडीने परत करा, असे स्पष्ट निर्देश ‘इंडिगो‘ कंपनीला देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या प्रवाशांचे अडकलेले सर्व साहित्य (बॅगेज) ४८ तासांच्या आत परत करा, अशा सूचनाही विमान कंपनीला दिल्याचे त्यांनी सांगितले. (indigo refund baggage order murlidhar mohol)

 

Pune Cricket Academy : बीसीसीआय दर्जाचा देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप

 

 

‘इंडिगो’ या विमान कंपनीच्या नियोजनातील गोंधळामुळे गैरसोयींचा सामना करावा लागलेल्या प्रवाशांच्या तिकिटाचा परतावा आणि साहित्य परत करण्याबाबत घेतलेल्या केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पत्रकारांना दिली. प्रवाशांनी तिकिटे आरक्षित करताना वापरलेल्या पेमेंट पद्धतीच्या मूळ खात्यामध्ये हा परतावा जमा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. “या बेजबाबदार प्रकारामुळे देशातील विमानसेवा आणि प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल जबाबदारी निश्चित केली जाईल,” असा इशाराही मोहोळ यांनी दिला.

 

 

विमान कंपन्यांच्या मनमानी कारभारावर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत तिकीट दरांवर मर्यादेसह प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चितपणे केली जाईल. चौकशी अहवालानुसार ज्याची चूक असेल, त्याच्यावर कठोर कारवाई होईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

पुणे महापालिकेचा कारनामा : एका खड्ड्यासाठी ₹50 हजार खर्च?

 

 

पुणे विमानतळावरील स्थितीबद्दल बोलताना त्यांनी माहिती दिली की, “मागील काही दिवस ‘इंडिगो‘च्या विमानांची नियोजित जवळपास ९०% उड्डाणे रद्द झाली होती, परंतु ताज्या माहितीनुसार ५७ पैकी ३७-४८ उड्डाणे पुन्हा सुरू होत आहेत. स्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. मात्र, चूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर कारवाई निश्चित आहे.”

 

 

“इतर विमान कंपन्यांनी वाढविलेल्या तिकीट दरांवर नियंत्रण आणले आहे. ठराविक अंतराप्रमाणे कमाल भाडे निश्चित करून दर मर्यादित केले आहेत. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. स्थिती त्वरित सुधारण्यासाठी ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन’ (FDTL) काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,” असे मोहोळ यांनी सांगितले.

 

नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या काही आमदारांची तिकीटे रद्द झाल्याच्या प्रश्नावर बोलताना, अनेक आमदारांनी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. “काही जण रस्त्याने, तर काहीजण एअर इंडिया किंवा स्पाईसजेटने जात आहेत. काहीजण एकत्र येऊन चार्टर फ्लाईट काढण्याचाही विचार करत आहेत. राज्यातील प्रत्येक भागातील आमदारांना नागपूरला पोहोचणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.

 

 

पुणे विमानतळावर इंडिगोने आठ विमाने पार्क करून अडथळा निर्माण केल्याच्या घटनेची ही गंभीर दखल घेण्यात आली असून, ती विमाने ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे विमानतळ लष्कराचा हवाई तळ असला तरी, या प्रकारामुळे एअरस्पेसवर कोणताही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Local ad 1