पुणे महापालिकेचा कारनामा : एका खड्ड्यासाठी ₹50 हजार खर्च?
15 कोटी रुपये खर्चून महापालिकेने बुजवले 2,989 खड्डे
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्डेमुक्ती मोहिमेला एक महिना पूर्ण झाला असून, खड्डे दुरुस्तीसाठी पुणे महापालिकेने (PMC) तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेच्या पथ विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 2,989 खड्डे दुरुस्त करण्यात आले. या खर्चाचा हिशेब लावल्यास, प्रत्येक खड्डा बुजवण्यासाठी सरासरी ५० हजार रुपये इतका खर्च झाल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या महिनाभरापासून पथ विभागाने ‘खड्डे मुक्त रस्ते’ ही मोहीम युद्धपातळीवर राबविल्याचा दावा केला आहे. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती दिली की, तातडीच्या दुरुस्तीचे काम सर्वाधिक वेगाने करण्यात आले. (pune pmc khadde mohim 50 hajar kharc rohan suravase patil tika)
महापालिकेच्या कामाचा दावा
* दुरुस्त खड्डे : 2,989 (वेगवेगळे, आयसोलेटेड खड्डे)
* दुरुस्ती केलेले एकूण क्षेत्रफळ : 1 लाख 88 हजार 948 चौरस मीटर (अंदाजे 18 हेक्टर)
* शिकायत निवारण : ‘रोड मित्र ॲप’वरील 3,904 पैकी केवळ 34 तक्रारी प्रलंबित.
* अतिरिक्त काम : सुमारे 1,800 ठिकाणी रस्त्यांची **मिलिंग** करून डांबरीकरणाचा नवा थर टाकण्यात आला.
* कारवाई : निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई करत ‘महाप्रीत’सह पोलिसांच्या ठेकेदारालाही ‘स्टॉप वर्क’ आदेश दिले.
“प्रशासनाचा दावा फोल”
“महापालिका प्रशासनाचा दावा फोल आहे. उपनगरामधील रस्त्यावरील खड्डे कधी बुजवणार आहेत? सायकल स्पर्धेसाठी काम सुरु असलेले मार्ग वगळता, इतर रस्त्यांवरील खड्डे रॉड विभागाला दिसत नाहीत का, हा मोठा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी बुजवलेले खड्डे पुन्हा जैसे थे होतात. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी वापरले जाणारे खडी आणि डांबर निकृष्ट दर्जाचे असते का, हा प्रश्न निर्माण होतो.” – रोहन सुरवसे पाटील, (राष्ट्रवादी काँग्रेस)
“रस्त्यांवरील खड्डे हा शहरातील नागरिकांसाठी मोठा प्रश्न आहे. एक महिना पूर्ण क्षमतेने काम करून मोठ्या प्रमाणात रस्ते सुधारले आहेत. मात्र ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. पुढील काळातही काम सातत्याने सुरू राहील, असा आमचा मानस आहे. या मोहिमेमुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील खड्ड्यांची समस्या कमी झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.” – अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख,पुणे महापालिका

