Samruddhi Highway । साहित्यिक डॉ. पी. विठ्ठल यांचा समृद्धी महामार्गावरील प्रवास आणि आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत

Samruddhi Highway । नांदेड : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana Bus Accident) अपघातात 25 जणाचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर समृद्धी महामार्ग कसा चांगला आहे, चालक कशी चूक करतात. तर काही जणांनी त्यावर होणार्‍या अपघातांना उद्घाटनाची घाई कारणीभूत आहे, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अनेकजण समृद्धी महामार्गावर आलेले अनुभव (चांगले आणि वाईट) सोशल मिडियावर शेअर करत आहेत. साहित्यिक डॉ.पी.विठ्ठल (Dr.P.Vitthal) यांनीही आपल्या अनुभवाला फेसबुकवर वाट मोकळी करुन दिली. त्यांची पोस्ट आहे, तशी खाली  देत आहोत. (Travel and experiences on the Samruddhi Highway)

 

 

साहित्यिक डॉ. पी. विठ्ठल  यांची फेसबुक पोस्ट

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सुमारे पंचवीस प्रवाशांचा जीव गेला, ही घटना भयंकर वेदनादायी आहे. ट्रॅव्हल्स पलटी होऊन ती जळाली आणि यात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात कोणत्या कारणाने झाला, ही चर्चा पुढे अनेक दिवस सुरु राहील, पण ट्रॅव्हल हा प्रवासासाठी कधीही सुरक्षित पर्याय मला वाटलेला नाही. असो.
या महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले होते. त्यामुळे या महामार्ग विषयी प्रचंड उत्सुकता होती.  मात्र ही उत्सुकता नंतर संपली आणि त्याऐवजी लोकांच्या मनात भीती बसली.
दररोज कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात घडत आहेत. खरे तर या महामार्गाकडे विकासाचे प्रारूप म्हणून आणि राज्य सरकारचा विशेषत: फडणवीस, गडकरी यांच्या संकल्पनेतील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणूनही पाहिले गेले. विदर्भ, मराठवाडा, नाशिक, मुंबई अशा सुमारे नऊ जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग असल्यामुळे प्रवाशांनी प्रारंभी या प्रकल्पाचे स्वागत देखील केले. परंतु पहिल्या दिवसापासूनच हा मार्ग ‘अपघात मार्ग’ ठरला.
मुळात या महामार्गावर अपघात होण्याची जी कारणे दिली जातात, त्यात एक म्हणजे वाहनांचे ‘टायर फुटणे’ आणि दुसरे म्हणजे ‘रोड हिप्नोसिस’ (रस्ता संमोहन)
या रस्त्यावर कुठेही खड्डे, वळण किंवा वाहनांची वर्दळ नाही. त्यामुळे वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. परिणामी उष्णता आणि घर्षणाने टायर फुटतात. गाड्या पलटी होतात. दुसरे कारण म्हणजे रोड हिप्नोसीस. नजरेसमोर कोणताच अडथळा नसल्यामुळे ड्रायव्हर संमोहन स्थितीत जातो, असे सांगितले जाते.
▪️ माझा अनुभव :  जानेवारी महिन्यात वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. मी एकटाच कारने नांदेडहून वर्धा येथे आलो. संमेलनानंतर मला औरंगाबादला (छ. संभाजीनगर) जायचे होते.
जाण्यापूर्वी औरंगाबादहून जे लोक कारने आले होते, त्यापैकी कुणीही ‘समृद्धी’ने प्रवास केलेला नव्हता. मी या मार्गावरून जाऊ नये असे अनेकांनी सुचवले होते. पण मी मात्र ठाम होतो. वर्ध्यातून  निघताना पाचोऱ्याचे डॉ. वले हेही ‘सोबत येतो’ म्हणाले. त्यामुळे थोडा धीर आला.
इंटरचेंजवरून महामार्गावर प्रवेश करतानाच एका मित्राचा फोन आला. ‘अहो! त्या रस्त्यावर खूप अपघात होतात. जाऊ नका. जायचेच असेल तर सावकाश जा.’ या मित्राच्या फोनने मनात भीती निर्माण झाली होती खरी;  पण मी महामार्गावर प्रवेश केलेला होता.
एक गोष्ट मात्र मी मनाशी ठरवली, ताशी शंभरपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवायची नाही व दर तासानंतर थोडावेळ ब्रेक घ्यायचा. मी या दोन्ही गोष्टी तंतोतंत पाळल्या. रस्ता भव्य आहे. सुनसान आहे. रस्त्यात कुठेही झाडे, हॉटेल किंवा विश्रांतीसाठी थांबे नाहीत. पेट्रोलपंपही खूप अंतरावर आहेत. त्यामुळे ‘रोड हिप्नोसिस’ ची शक्यता खूप मोठी असते. आपले डोळे आपोआप बंद होऊ लागतात किंवा आपण शून्यात जाण्याची शक्यता असते. (अर्थात असे घडेलच असेही नाही.)
अशावेळी घटकाभर थांबून फेरफटका मारणे किंवा सहप्रवाशाशी गप्पागोष्टी करणे महत्त्वाचे ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मसंयम हवा. वेग नको.
माझा प्रवास उत्तम सुरू होता, पण मेहकरजवळ एक कार डिव्हायडरवर धडकून चक्काचूर झालेली आम्ही पाहिली. कारमधील एक व्यक्ती रोडवर बेशुद्ध झालेली होती. त्याची बायको त्याचे रक्तबंबाळ डोके मांडीवर घेऊन आक्रोश करत होती. हे दृश्य भयंकर होते. साधारण अर्ध्यातासानंतर तिथे महामार्ग पोलीस आणि ॲम्बुलन्स आली. पुढे त्या प्रवाशाचे काय झाले? माहीत नाही. परंतु या अपघाताने माझ्या गाडीचा वेग शंभरवरून एकदम सत्तर-ऐंशीवर आला. आपल्या डोळ्यासमोर एखादी घटना घडली की, त्याचा मानसिक परिणाम आपल्यावर होतोच.
पुढच्या तासाभरात मी औरंगाबादला सुखरूप 😊पोहोचलो. सुमारे साडेसहाशे रुपये टोल फास्टटॅगमधून वजा झाला.
मुद्दा हा आहे की, या रस्त्याविषयी लोकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. सहकुटुंब प्रवास करणारे या रस्त्यावर खूप कमी दिसतात. रस्ता सुनसान असल्यामुळे हरीण, कुत्रे, बकरी वगैरे प्राणी अचानक गाडीसमोर येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यंत अलर्ट राहूनच इथे गाडी चालवावी लागते.
असेच अपघात घडत राहिले तर ‘समृद्धी महामार्गा’च्या वाटेलाही लोक जाणार नाहीत. ‘सुखकर’ प्रवासाऐवजी ‘भयभीत’ प्रवास कुणाला आवडेल?
या महामार्गावर स्वतःला वाचवायचे असेल तर वेगावर ‘नियंत्रण’ हवे. अन्यथा समृद्धी ही एक ‘भयकथा’च ठरेल. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे दुःख भयंकर असणार.
‘श्रद्धांजली’शिवाय आपल्या हातात तरी दुसरे काय आहे?😔
@ पी. विठ्ठल 🌿
Local ad 1