...

विजयचे मारेकरी कोण ?

माझ्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयामधून मी बाहेर पडलो. स्टेट्स हॉटेलमध्ये बारामतीचे शिक्षक लक्ष्मण जगताप मला भेटण्यासाठी माझी वाट पाहत होते. मी खुर्चीत बसताच जगताप सर माझा हात हातामध्ये घेऊन म्हणाले, ‘भाई, रविवारचा लेख पुन्हा सुरू करा. लेख बंद झाल्यापासून आयुष्यात काहीतरी चुकल्यासारखे वाटते’. मी एका क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो, ५ जानेवारीपासून मी पुन्हा ‘भ्रमंती’ १५० वर्तमानपत्रांत लिहितोय. तेही मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराथी (Marathi, Hindi, English, Urdu, Gujarati) भाषिक पेपरमध्ये येणार आहे. (Sandeep Kale Bhramanti Live Story)

 

 

RTE admission process । आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार ?

 

विजयचे मारेकरी कोण ?

मला पुण्यावरून राधिका वहिनीचा फोन आला. वहिनी फोनवर जोरजोराने रडत होत्या. भावजी विजय आम्हाला सोडून गेला, असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. काय करावे काही सुचेना. समोर असलेला पाण्याचा ग्लास मी तोंडाला लावला. पाणी पिऊन झाल्यावर मला अश्रू अनावर झाले. क्षणाचाही विलंब न करता मी पुण्याच्या दिशेने निघालो. (Who is Vijay’s killer?)

 

परभणीचा असलेला विजय निकम आणि माझी मैत्री नांदेडच्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयामधली. पुढे तो संभाजीनगरलाही उच्च शिक्षणासाठी सोबत होता. पुण्याला एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विजयला प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. तेव्हापासून विजय पुण्यात स्थायिक झाला. मी मुंबईतून पुण्याला गेल्यावर नेहमी विजयकडे जायचो. नेहमी भेटीगाठी व्हायच्या, सर्व चांगले चालले असताना अशी वाईट बातमी आल्यामुळे मला धक्का बसला. विजयसोबतचे सर्व प्रसंग माझ्या डोळ्यांपुढे येत होते. विजयच्या जाण्याने मलाही प्रचंड धक्का बसला होता. माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मी घरी पोहचलो आणि वहिनीने एकदम हंबरडा फोडला. मी स्वतःला सावरत बाहेर पडलो. विजयच्या घरी संपर्क केला. मन घट्ट करून विजयला गावाकडे घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स घेऊन आलो. विजयचे पुण्यातले सर्व नातेवाईक, मित्र  खूप बीझी. जसे त्यांनाच जगात काम आहे. आमच्या सोबत येण्यासाठी कुणी हिंमतही दाखवली नाही. राधिका वहिनीचा चुलत भाऊ म्हणाला, मला ‘डेडबॉडी’ जवळ भीती वाटते. त्याला आता काय बोलावे मला काही सूचेना. आम्ही पुण्यातून निघालो. विजयचा मुलगा श्रीकांत अकरा वर्षांचा. मुलगी श्रीजया चार वर्षांची. मुलगी माझ्याजवळ बसली होती. मुलगा एका हाताने विजयच्या ‘डेडबॉडी’ला आधार देत राधिका वहिनीला सावरण्याचे काम करत होता. पुणे सोडल्यावर एक दीड तासाने वहिनींनीही आता मन घट्ट करायला सुरू केली होती. रडून रडून त्यांच्या डोळ्यातले अश्रू आटून गेले होते. वहिनीच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमत होत नव्हती. त्या ॲम्ब्युलन्समध्ये मन हेलावून टाकणारे अजून एक दृश्य वारंवार डोळ्यासमोर होते. विजयची मुलगी श्रीजया मला सतत म्हणत होती, ‘काका मला बाबांसोबत जाऊन झोपायचे आहे. माझ्या बाबाला उठवा ना काका.? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. माझे बाबा असे का झोपलेत काका, ते माझ्याशी बोलत का नाहीत काका. ती छोटी मुलगी केविलवाण्या आवाजात मला विनंती करत होती, आणि मी तिचा एकही शब्द माझ्या कानात घेत नव्हतो. माझ्या मनाची अवस्था फार वाईट होती. विजय या जगातून का निघून गेला. कुठला ताण-तणाव विजयच्या मागे होता.? याचं कारण मलाही माहीत होतं आणि वहिनींनाही माहिती होतं. गेल्या आठ महिन्यांपासून विजयचे कुटुंब अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये चाललं होतं. त्या सगळ्यांमधून सावरताना आणि ती घडी बसवताना विजयला कठोर होता आले नाही.  त्यातून विजयला हृदयविकाराचा झटका आला, हे निमित्त झालं.

मी आता सांगतोय हा प्रसंग आहे चार वर्षांपूर्वीचा. विजय नागपूरच्या एका चांगल्या महाविद्यालयामध्ये नोकरीसाठी होता. विजयच्या आईला कॅन्सर झाला होता. आईला पुण्यात सतत दवाखान्यात न्यावे लागायचे. आई-वडिलांची होत असलेली फरपट विजयला पाहावत नसे. त्यांनी मला सल्ल्यासाठी फोन केला आणि विचारलं, ‘मी नागपूरचे महाविद्यालय सोडून पुण्याला येणार आहे. मला पुण्यामध्ये एखाद्या इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये नोकरी पाहा’. आमच्या दोघांच्याही प्रयत्नाने एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विजयचे काम झाले. आईची सेवा करत,पुण्यासारख्या शहरात एका नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये सेवेची संधी मिळाली. हे दोन्ही विषय घेऊन विजय आनंदी होता. पण तो काम करत असलेल्या महाविद्यालयात तो जसे जसे दिवस घालवत होता, तसे तसे त्या कॉलेजमध्ये नाव मोठे आणि लक्षण खोटे अशीच परिस्थिती आहे, हे विजयच्या लक्षात येऊ लागले. त्या महाविद्यालयात चार-पाच महिन्यांनंतर पगार व्हायचा. तोही एखाद्या महिन्याचा. विजयकडे कुठून पैशाची आवक नव्हती. महाविद्यालयामध्ये असणारं काम इतकं मोठ्या स्वरूपात होतं की, महाविद्यालयायाच्या कामाशिवाय इतर ठिकाणी चार पैसे मिळतील यासाठी हात पाय हलवायची संधीच नव्हती. दुसरीकडे काम मिळण्याची संधी येत होती, पण या महाविद्यालयामध्ये दोन-चार महिने थकलेला पगार दुसरीकडे गेल्यावर मिळत नाही. असे अनेक किस्से विजय त्या महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये ऐकून होता. विजय अत्यंत स्वाभिमानी, कोणाला उसने पैसे मागील तर नवल. मागच्या महिन्यात मला राधिका वहिनीचा फोन आला. त्यांनी मला सारी परिस्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, आठ महिन्यांपासून विजयचा पगार झाला नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, संसारासाठी लागणारा खर्च कुठून करायचा, म्हणून विजय फार टेन्शनमध्ये होता.

 

वहिनीच्या फोननंतर मी त्या महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या काही लोकांशी बोललो ही होतो. पण काही झाले नाही. मी चार पैशांची मदतही विजयला केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून विजय प्रचंड टेन्शनमध्ये आहे असं राधिका वहिनी मला वारंवार फोन करून सांगायच्या. बीपी, शुगर, थायरॉईड सारख्या आजारांनी विजय भोवती विळखा घातला होता, हेही मला वहिनीने सांगितलं. बरे हा प्रश्न एका विजयचा नव्हता, तर त्या महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या हजारो जणांचा होता. त्या महाविद्यालयात प्रवेशासाठी  विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी फीस, वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी मदत, त्या महाविद्यालयावर असलेला राजकीय वरदहस्त हे सगळं पाहता, त्या प्राध्यापकांची पगार दर महिन्याला करायला त्या संस्थाचालकाला काहीच अडचण नव्हती, पण तरीही तिथे पगार का होत नव्हते याचे उत्तर कोणालाही सापडत नव्हते. आठ दिवसांनी बोलता बोलता विजयने मला सांगितलं होतं की, राज्यामध्ये अडीच हजार संस्था अशा  आहेत. ज्या संस्थांमध्ये काम करणारे साडेचार लाखांहून अधिक शिक्षित माणसे, ज्यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नाही. अनेक ठिकाणी तो बुडवला जातो. हे या राज्यातले कटू सत्य आणि वास्तव आहे.
  माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजवत होते. आज विजय गेला. उद्या कोणीतरी जाईल. परवा कोणीतरी जाईल. हे कधी थांबणार आहे की नाही? आम्ही विजयच्या घरी पोचलो. अख्खी गल्ली विजयसाठी थांबली होती. आमची गाडी थांबताच विजयचे अनेक नातेवाईक छाती आपटू आपटू रडत होते. विजयची आई मागच्या वर्षीच गेली. तीन बहिणी, एक भाऊ, काका, आत्या सारे जण माझ्याकडे पाहत होते.  त्या प्रत्येकाच्या नजरा मला सांगत होत्या, मी ठरवलं असतं तर यातून काहीतरी मार्ग काढला गेला असता. कोणाचीही समजूत घालण्याची माझी हिम्मत होत नव्हती. विजयच्या काकाने विजयचा मुलगा श्रीकांतला घराबाहेर नेलं. श्रीकांतच्या डोक्यावरचे केस काढले. त्याच्या पाठीवर घोंगडी पांघरली गेली. श्रीकांत तिरडी घेऊन अनवाणी पायाने विजयच्या ‘डेडबॉडी’ समोर रस्त्याने चालत होता. खूप उशीर झाल्यामुळे विजयच्या “डेडबॉडी’चा वास सुटला होता. तसाच वास राज्यातल्या शोषण करणाऱ्या अनेक संस्थाचालकांच्या लालचीपणाचा सुटलाय, असा विचार माझ्या मनात ते सारे दृष्य पाहून येत होता.
मी विचार करत होतो, विजयचे मारेकरी नेमके आहेत तरी कोण? विजयच्या आख्या कुटुंबाला रस्त्यावर आणायला कोण जबाबदार आहे.? विजयच्या त्या लहान लहान मुलांना अनाथ करायला जबाबदार कोण आहे.  ज्या बापाने विजयला त्याच्या मांडीवर लहानाचे मोठे केले, त्याच्या मांडीवर विजयचा मृतदेह होता. हे सारे प्रश्न एका विजयला घेऊन नव्हते. हा प्रश्न राज्यातल्या त्या शोषित असणाऱ्या उच्च शिक्षितांचे आहे. जो निमूटपणे हे शोषण सहन करतो, त्या सर्व शोषितांना हे माहीतच नाही, या शोषणाला प्रचंड राजाश्रय आहे. हे शोषण मुद्दाम जाणून-बुजून केले जाते. या शोषणामध्ये  प्रचंड अर्थकारण आहे.  ज्या अर्थकारणातून संस्थाचालकांच्या आणि राजकारण्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघतो. बापरे किती सारे प्रश्न होते आणि त्यांची धक्कादायक उत्तरेही होती.
 दुसऱ्या दिवशी आम्ही विजयच्या अस्थी गोळा करायला स्मशानात गेलो. त्या राखेमध्ये फार अस्थी नव्हत्याच. असे वाटत होते, त्या संस्थाचालकाने खूप सारे शोषण करून विजयची हाडे शिल्लक ठेवलेच नाहीत. इतकं शोषण विजयचे केलं होतं. दोन दिवस विजयकडे राहून मी पुन्हा परभणीवरून मुंबईला जायला निघालो.  या काळात विजय सारख्याच असणाऱ्या अनेक केस स्टडी मी अभ्यासल्या. अनेक दिग्गजांशी मी बोललो. मला वाटत होते, आपण समजतो, तेवढा हा विषय साधासुधा नव्हता, तर हा विषय अत्यंत गंभीर होता. ज्यांच्याकडे भरभरून आहे तिथेही शोषण होतं. ज्यांच्याकडे जेमतेम आहे तिथेही शोषण होतं. अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या उच्चशिक्षित वर्गाला मदत करण्यासाठी, त्यांचे कुटुंब वाचवण्यासाठी कोणीतरी वाली म्हणून पुढे येणार आहे की नाही, असा प्रश्न मला पडला होता. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल बरोबर ना..
– संदीप काळे 
Local ad 1