पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी मोठा गोंधळ घडला. परिषदेचे आजीव सभासद राजकुमार भानुदास धुरगुडे हे संवैधानिक मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी सभागृहात आले असता, मिलिंद जोशी यांच्या अनधिकृत गटातील भाडोत्री गुंडांनी त्यांना प्रवेश करण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचा दरवाजा आतून बंद करून चोरट्याप्रमाणे बैठक घेण्यात आली आणि अवघ्या तासाभरातच ती बैठक गुंडाळण्यात आली.
धुरगुडे यांनी “सत्य जरी एकला – असत्याला पुरून उरला” तसेच “मसापचे पवित्र मंदिर – नाही कुणाची खाजगी जागीर” अशा आशयाचे फलक घेऊन सभागृहात आले होते. या फलकाद्वारे त्यांनी मसापचे कार्यालय कोणत्याही व्यक्ती किंवा गटाची खाजगी मालमत्ता नाही हा स्पष्ट संदेश दिला.
धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
धुरगुडे यांनी यापूर्वीच धर्मादाय आयुक्तांकडे मिलिंद जोशी आणि इतर अनधिकृत गटाविरोधात तक्रार दाखल केली होती. या अनधिकृत गटाला अशा प्रकारची बैठक घेण्याचा कुठलाही अधिकार नसतानाही ते मसाप कार्यालयात बैठक घेत होते. याला विरोध करण्यासाठीच राजकुमार धुरगुडे तेथे आले होते.
सध्या मसापचे कामकाज स्वयंघोषित गट चालवत असून त्याचे नेतृत्व मिलिंद जोशी करत आहेत. त्यांनी जबरदस्तीने मसाप कार्यालयाचा ताबा घेऊन तेथे बैठक घेतली. या विरोधात कालच राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात कलम ४१ (अ) अंतर्गत औपचारिक तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीची माहिती आज सकाळी मसाप कार्यालयात देऊन अशा अनधिकृत गटाला येथे बैठक घेण्यास मज्जाव करावा अशी विनंती केली होती. याचाच संदर्भ घेऊन ते आज सभागृहात आपला निषेध संवैधानिक मार्गाने व्यक्त करण्यासाठी आले होते. मात्र, मसापच्या अनधिकृत गटाने त्यांना सभागृहात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही धुरगुडे यांनी सभागृहात जाऊन आपला निषेध नोंदवला.
धुरगुडे यांची भूमिका
“लोकशाही माध्यमातून निषेध नोंदवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. पण मसापच्या बेकायदेशीर गटाने तो अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. जे लोक असंविधानिक पद्धतीने संस्थेचा ताबा घेऊन कारभार चालवत आहेत, त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल,” असा तीव्र निषेध धुरगुडे यांनी व्यक्त केला.
साहित्यिक व सभासदांमध्ये नाराजी
या प्रकारामुळे साहित्यिक व सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेतील सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
काय आहे कलम ४१(अ)?
“बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट, १९५०” (Bombay Public Trusts Act, 1950 – महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५०) अंतर्गत कलम ४१(अ) हे विशेष प्रावधान आहे. या कलमानुसार धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner) किंवा त्यांचे प्रादेशिक सहायक/उपआयुक्त यांना सार्वजनिक विश्वस्त संस्था/ट्रस्टचे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी आदेश देण्याचा अधिकार आहे.यामध्ये ते संस्थेच्या कार्यकारिणीला किंवा विश्वस्तांना सूचना (Directions) देऊ शकतात.