पुणे : सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…
या संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही निवड पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या महामंडळाच्या बैठकीत झाली. या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह अनेक साहित्यसंस्था आणि क्षेत्रीय मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय नाव मानले जाते. त्यांच्या लेखनात ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, उर्दू, मल्याळम, बंगाली, ओडिया अशा विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. २०१६ मध्ये त्यांच्या ‘महानायक’ कादंबरीला गेल्या दोन दशकांतील सर्वोत्तम वाचनीय कादंबरीचा मान मिळाला होता. तर २०१७ मध्ये त्यांना वाचकप्रियतेचा सर्वोच्च पुरस्कारही मिळाला आहे. आता ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान होत असल्याने साहित्यविश्वात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे.