पुणे, १४ ऑक्टोबर २०२५ – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या मतदार यादी पुनरावलोकनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे.
नागरिकांना आपल्या नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांबद्दल हरकती अथवा दुरुस्त्या नोंदविण्याची संधी १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिली जाणार आहे. या कालावधीत मतदारांनी आपल्या नावाची नोंद नीट तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्राप्त हरकती आणि दुरुस्त्यांची निवडणूक विभागाकडून छाननी करून आवश्यक दुरुस्त्या पूर्ण केल्यानंतर २८ नोव्हेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. त्यानंतर १४ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्यात प्रत्येक मतदान केंद्रावरील अद्ययावत मतदारांची नावे असतील.
महानगरपालिका निवडणुका जवळ येत असल्याने, या मतदार यादीच्या प्रक्रियेकडे सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने नागरिकांना वेळेत आपली नावे तपासण्याचे आणि आवश्यक असल्यास हरकती सादर करण्याचे आवाहन केले आहे.