पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. कल्याणीनगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात पुन्हा ससूनपर्यंत पोहोचली आहे. (Pune Drunk and Drive Case Reached Soon: Dr. Ajay Tavere arrested) अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार करून अहवाल दिल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅब चे एचओडी डॉ अजय तावरे आणि सीएमओ डॉक्टर श्रीहरी हरणोर यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती मिळत आहे. (Pune Drunk and Drive Case Reached Soon: Dr. Ajay Tavere arrested)
कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिक पुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिक पुत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनी ही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल.