पुणे, आशियातील सर्वात मोठे मेटल फॉर्मिंग तंत्रज्ञान प्रदर्शन म्हणून ओळखले जाणारे ‘IMTEX Forming 2026’ येत्या २१ ते २५ जानेवारी दरम्यान बंगळुरू इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (BIEC) येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) तर्फे आयोजित केले जात आहे.
या भव्य प्रदर्शनात विविध देशांतील ६०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होणार असून कार्यक्रम ४६ हजार चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या चार मोठ्या हॉल्समध्ये भरविण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक मेटल फॉर्मिंग, मशीनरी, डिजिटल तंत्रज्ञान व अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान पाहायला मिळणार आहे.या संदर्भातील माहिती IMTMA पश्चिम विभाग संचालक प्रसाद पेंडसे यांनी दिली.
या प्रदर्शनात टूलटेक, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री 4.0, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, WeldExpo, वेल्डिंग तंत्रज्ञान, तसेच मोल्डिंग, फास्टनर्स, फिक्सिंग आणि मेटल फॉर्मिंगमधील नव्या इनोवेशन्स प्रदर्शित केले जाणार आहेत.
तसेच २२ व २३ जानेवारी 2026 रोजी फॉर्मिंग टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, तसेच विद्यार्थ्यांसाठी जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जर्मनी, इटली, जपान आणि तैवानमधील प्रमुख तंत्रज्ञान गटांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे.
प्रदर्शनाच्या घोषणावेळी IMTMA पश्चिम विभाग अध्यक्षा इंग्रिड रस्किन्हा, उपाध्यक्ष विक्रम साळुंखे आणि सहायक संचालक गौरव सिंग उपस्थित होते.

