‘त्यांनी’ काही केले तर ते ‘अमर प्रेम’ आणि इतरांनी मुस्लिमांची बाजू घेतली तर ते ‘लव्ह जिहाद’ : उद्धव ठाकरे
पुणे : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करताना म्हटले की, “शिवसेना भाजपसोबत असताना प्रखर हिंदुत्व मांडले आणि भाजपला सोडले म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं, असं म्हणणं हास्यास्पद आहे. भाजपनेच मुस्लिमांना खुश करण्यासाठी ‘सौगात-ए-मोदी’ वाटली. मग ते हिंदुत्ववादी राहिले का?”
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर तसेच माध्यमांच्या जबाबदाऱ्यांवर सडेतोड भाष्य केले. कार्यक्रमाला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेसबरोबर गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडले, अशी ओरड भाजप करते. पण तुम्ही चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांच्याबरोबर गेलात, ते हिंदुत्ववादी आहेत का? ३२ लाख मुस्लिमांना ‘सौगात-ए-मोदी’ वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी कसा?”
“ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सौफिया कुरेशी यांना ‘पाकिस्तान की बहिण’ असे संबोधणारे भाजप नेतेच आहेत. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. माध्यमांनीही त्यांच्या दुहेरी भूमिकांवर प्रश्न उपस्थित करायला हवेत,” असेही ठाकरे म्हणाले.
पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “टिळक आणि आगरकर यांची पत्रकारिता आज राहिली आहे का? चुकीच्या कामांवर प्रश्न विचारण्याची हिंमत आज किती पत्रकारांमध्ये आहे? अंधभक्त वर्ग वाढला आहे; त्यांना दृष्टी देण्याची जबाबदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, “त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे, केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, तरीही ते हतबलतेने वागत आहेत. एवढ्या शक्ती असूनही ते हतबल का आहेत, हे मला कळत नाही.