...

मराठी अस्मितेच्या पार्श्वभूमीवर ‘जय गुजरात’च्या घोषणेने खळबळ

पुणे. महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि स्वाभिमान यावरून आधीच वातावरण तापलेलं असताना, पुण्यातील कोंढवा भागात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ असा नारा देत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटरच्या उद्घाटनासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

 

Lohegaon Airport। लोहगाव विमानतळावर भटक्या श्वानांचा त्रास कायम

 

एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सांगता “जय हिंद, जय महाराष्ट्र” अशा घोषणा देत केली. पण काही क्षणांनी ते पुन्हा माईकवर आले आणि “जय गुजरात” अशी घोषणा केली. त्यांच्या या अनपेक्षित विधानामुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि संभ्रम निर्माण झाला, तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक नवा वाद पेटला.

 

अमित शहा यांचं कौतुक, पण ‘जय गुजरात’चा धक्का

कार्यक्रमाला अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी भाषणात बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले. मात्र, भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’ असं म्हणताच सर्वांचे लक्ष त्यांच्यावर खिळले आणि सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

 

 

विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधीच अस्वस्थता असताना, शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधकांना हल्ला चढवण्याचा नव्या मुद्द्याचा आधार मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेंवर घणाघात केला आहे.

 

 

सुषमा अंधारे म्हणाल्या – “लाचारगिरीची शर्यत सुरू झाली आहे”
सुषमा अंधारे म्हणाल्या, “मला यामध्ये काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्रद्रोही निर्णय घेऊन आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला दिल्लीच्या चरणांशी अर्पण करून मुख्यमंत्रिपदाचे बक्षीस मिळवलेलं आहे. हे बक्षीस मिळाल्यावर आता त्याचं समर्थन कसं करायचं, याची स्पर्धा सुरू झाली आहे. सध्या अजित पवार यांनी सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत आणि एकनाथ शिंदे हळूहळू एकटे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची कृपा मिळवण्यासाठी ‘जय गुजरात’ म्हणणं गरजेचं वाटू लागलं आहे.

 

जिथे राज्याचा मुख्यमंत्री ‘जय गुजरात’ म्हणतो, तिथे सुशील केडिया सारखे लोक ‘मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करा’ असे गर्वाने बोलतात. मराठी अस्मितेला ठेच देणाऱ्यांविरोधात कसे वागायचे, हे आता महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवायचं आहे. भाजपने काही राज्यात ‘नो हिंदी, नो बिझनेस’ हा ट्रेंड चालवला. आता मराठी जनतेने ‘नो मराठी, नो कॉपोरेशन’, ‘नो मराठी, नो बिझनेस’, ‘नो मराठी, नो कनेक्शन’, ‘नो मराठी, नो व्होटिंग’ असा ट्रेंड सुरू केला पाहिजे.”

 

 

“केम छो, एकनाथ शिंदे साहेब?” – जितेंद्र आव्हाड यांचा उपरोधिक टोला
एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेनंतर राज्यातील विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही खोचक शब्दांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “आता एकनाथ शिंदे साहेबांशी बोलायचे म्हणजे ‘केम छो, एकनाथ शिंदे साहेब?’ असे विचारावे लागेल. ज्या शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या अस्मितेसाठी झाली, त्या पक्षाचे एकेकाळचे नेते आज ‘जय गुजरात’ म्हणतात, हे अतिशय दुर्दैवी आहे.” “विनाशकाले विपरीत बुद्धी…या घोषणेवरून यापेक्षा दुसरं काय म्हणावं? ज्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अस्मितेची रक्षा व्हायला हवी, तेच लोक महाराष्ट्राच्या अस्मितेला सुरुंग लावत आहेत. हे लोक स्वतःचा सत्तेचा आकस मिटवण्यासाठी कोणत्याही थराला जातील.”

 

 

Local ad 1