“बोल बाबा, आज काय? दुपारीच चंद्रावर…” : अजित पवार

पुणे Pune news : शनिवारी (दि. 4) बारामतीजवळ कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिकाऱयांकडून ड्रोन भूमापन सर्व्हेक्षणाची माहिती घेत होते. यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांची गर्दी होती. यातून एक दारुडा मार्ग काढत थेट अजित पवारांजवळ येऊन पोहोचला. तो त्यावर थांबला नाही, चक्क अजित पवारांच्या पाया पडला. हे पाहून “बोल बाबा, आज काय दुपारीच चंद्रावर…” काय चाललेय काय, अशी विचारणा पवार यांनी केली. लगेच दारुड्याला सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केलं.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार हा दिवस बारामती शहर आणि तालुक्यासाठी राखीव ठेवतात. या दिवशी विविध कार्यक्रम, आढावा बैठक घेऊन माहिती घेऊन सूचना करत असतात. शनिवारी (दि 4) बारामती जवळ कटफळ येथे ड्रोन भूमापन सर्व्हेक्षणाचे प्रात्यक्षिक केले जात होते. अधिकारी हे सर्व्हेक्षण कसे केले जाते, याची माहिती अधिकारी पवार यांना देत होते. त्याचवेळी एक तरुण गर्दीतून वाट काढत डुलतच त्यांच्याकडे आला. त्यांच्या पायाही पडला. हा सर्वप्रकार काही क्षणात घडला.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलणार, याकडे लक्ष लागले होते. अजित पवार बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्या दारुड्याचा विषय घेताच ‘दारुड्यांमुळे गावात त्रास होत असल्याने दादा दारुधंदे बंद करायला पोलिसांना सांगा”, अशी मागणी खाली बसलेल्या एका कार्यकर्त्याने केली. त्यावर पवार यांनी अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आहेत का दौऱयात अशी विचारणा केली. तसेच सर्व बेकायदा दारूचे धंदे बंद करा, अशी तंबी दिली.

 

“दुपारीच एकजण चंद्रावर गेला होता. त्याला म्हटलं, अरे अजून दुपार आहे, आज शनिवार आहे, तर काय आता करता… काही जण व्यसनाधीन झाल्यावर पुढे त्रास होतो. त्यांना व्यसनापासून बाजूला करण्याचे काम आपण सगळ्यांनी केले पाहिजे,” असे सांगत माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत, अशा धंद्यांवर कारवाई करा, असे आदेश पवार यांनी दिले.

Local ad 1