सर्वस्व गमावून शून्यातून भरारी घेणारे व्यवसायिक संतोष कडू

 

मनात जिद्द, ध्येय, चिकाटी असेल, कष्ट करण्याची तयारी असेल मग परिस्थिती कशीही असो, कितीही संकटे आली तरी माणूस यशस्वी होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे संतोष कडू या पुण्यातील व्यावसायिकाने. एकवेळ एक रुपयाचा वडापाव घेण्याची परिस्थिती नव्हती, पण सध्या बाईंडिंग आणि सिक्युरिटी या व्यवसायातून ते ८०-९० लोकांना रोजगार देत एक यशस्वी व्यावसायिक म्हणून उभे राहिले आहेत. त्याचीच ही संघर्ष कहाणी. (Santosh Kadu is a businessman who lost everything and built a business from scratch)

 

 

नवी पेठेतील मातीच्या भिंती असलेल्या ८ बाय ८ च्या छोट्या घरात संतोष भागूजी कडू यांच्या कुटुंबातील पाच-सहा व्यक्ति राहत असत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील हमाली काम करायचे, हातगाडी ओढायचे, पडेल ते काम करायचे. शिवाय आई घरोघरी जाऊन धुणी-भांडी करायची. बहीणही तिला मदत करायची. तेव्हा ते आणि छोटा भाऊ किशोर भागूजी कडू शाळेत होते. पण कुटुंबाचा आधार असलेले वडील आजारी पडल्यावर होत्याचं, नव्हतं झालं. दोन वेळेच्या अन्नासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. कारण वडील सारखे अंथरुणाला खिळलेले असायचे. तेव्हा संतोष कडू बारा-तेराव्या वर्षी सातवीत होते. मग त्यांनी दिवसभर शाळा आणि इतर वेळेत पडेल ती कामे करायला सुरुवात केली. त्याकाळात त्यांनी भाजी-पाला, फळे विकली. पेपर टाकला. दूध पिशव्या घरोघरी पोहोचवल्या. त्यातून त्यांना महिन्याला शंभर रुपये मिळायचे. १९९१ साली सातवी पास झाल्यावर भावे हायस्कूलमध्ये त्यांनी आठवीत प्रवेश घेतला. सोबत घरची मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. तेव्हा सुरू झाला कडू यांचा संघर्ष. परंतु, खचून न जाता त्यांनी जिद्द सोडली नाही.

 

 

आपल्या चुलत भावाच्या बाईंडिंगच्या दुकानात नियमित काम करायला लागले. तिथं तासाला ५० पैसे मिळायचे. ५० पैसे, एक रुपया, दोन रुपये असे दहावीपर्यंत तासाला पैसे मिळत गेले. १९९३ साली दहावी बोर्डाचा सकाळी पेपर दिला की दुपारी कामाला हजर, रात्री उशिरापर्यंत मरणाची कामं करायची. कधी कधी सलग दोन-तीन दिवस कामं करावी लागायची. सोबत लहान भाऊही कामाला जायचा. पण वडिलांच्या आजारातही चुलते-पाहुणे वगैरे सुस्थितीत असलेल्या कोणाकडून मदतीचा हात मिळाला नाही. यांची कडूंना आजही खंत वाटते.

 

 

बाईंडिंगच्या कामात हळूहळू जम बसल्यावर पुढे त्यांना तासाला ३.५० रुपये मिळत होते. पण १९९४ साली वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी बाईंडिंगचे काम सोडून ऑफिस बॉयची नोकरी धरली. तर १९९५ साली जॉब सोडून पुन्हा भारत बाईंडिंगची कामे ठेकेदार पद्धतीने घ्यायला सुरुवात केली. घरातून कामं करून द्यायची, त्यातून आठवड्याला ८०० रुपये मिळत होते. वर्षभरातच त्यांना उत्तर पत्रिकेचे एक मोठे बाईंडिंगचं काम मिळाले. त्यातून महिन्यात ३०-४० हजार रूपयांचा फायदा झाला. त्याचवेळी आणखी काही पैशांची जुळवाजुळव करून त्यांनी आपले जुने मातीचं घर पाडून दोन मजली घर बांधले. तर काही मित्रांकडून दहा-दहा हजार घेऊन बाईंडिंगचे सेकंड हँड मशीन घेऊन एप्रिल १९९७ साली बाईंडिंग व्यवसायला सुरुवात केली. घरात खाली बाइंडिंगचे काम, तर वरच्या मजल्यावर सर्व कुटुंब राहायचे. सहा महिने सर्व व्यवस्थित सुरू होते, पण नोव्हेंबरमध्ये एक मोठा अपघात झाला आणि कडू यांचे दोन्ही पाय मोडले. खाजगी रुग्णालयात खर्च परवडत नसल्याने पंधरा दिवस ससूनला पूर्ण उपचार केला.

 

 

दोन-तीन वर्ष जागेवर एका बसून असताना, त्यांच्या भावाने आणि मित्रांनी व्यवसाय सुरू ठेवला. शिवाय मित्रांनी खूप मदत केली. त्याकाळात आईने सर्व काही केले. २००० साली त्यांना विम्याचे पैसे मिळाले. त्या पैशातून पुढे बंद पडलेला व्यवसाय पुन्हा जिद्दीने उभा केला. जिद्दीने पुन्हा ते स्वतःच्या पायांवर अन् व्यवसायात उभे राहिले. पुढे फ्लॅट घेतला, ज्यांनी मदत केली त्यांचे पैसे परत केले. २००४ साली २८व्या वर्षी लग्न झाले. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या बाइंडिंग व्यवसायात पाच-सहा कामगार आहेत. तसेच मित्रांसोबत पार्टनरशिपमध्ये एक सिक्युरिटी कंपनी सुरू केली. तेव्हा साधी सायकल घ्यायची परिस्थिती नव्हती, आता पंधरा-वीस लाखांच्या बाइंडिंग मशीन्स आणि दोन्ही व्यवसायातून ते ७०-८० लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

 

त्याकाळात पुणे डायरी, पी जोग स्कूल अशा मोठ मोठ्या संस्थांची कामे केली. हळूहळू व्यवसायाचा विस्तार केला. बाइंडिंगसोबतच प्रिंटिंग व्यवसाय सुरू केला. त्यासाठी प्रिंटिंग, कटिंग, पिनिंग, झेरॉक्स असे चार-पाच मशीन्स त्यांच्याकडे आहेत. त्यांचे शिक्षण झालेल्या भावे हायस्कूलने सपोर्ट केला. प्रामाणिकपणे चांगली कामे करून दिली की ते इतरांना सांगायचे. अशा पद्धतीने अनेक कामे मिळत गेली.

 

यात अनेक हातांनी केलेली मदत, अनेकजण पाठीशी उभे राहिल्यामुळे संतोष कडू यांचा इथपर्यंतचा यशस्वी प्रवास घडू शकला. सोबतच त्यांच्यात जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी होती. ज्या लोकांनी नाव ठेवली, हिणवले. त्यांनाही काहीतरी करूनच उत्तर द्यायचे होते. शिवाय वडिलांनी हमाली केली, आपण शिक्षण घेताना अनेक कामे केली, ती आपल्या मुलांना करावी लागू नये, म्हणून त्यांनी जिद्दीने हा व्यवसाय उभा केला. ज्या घरात एक वेळच्या खायचे वांदे होते, पण ही परिस्थिती ते विसरले नाही आणि सोबतच त्यांच्या मुलांनाही ती जाणीव करून दिली. शेवटी जिद्द, संघर्ष, ध्येयाने ते माणूस म्हणून उभे राहिले आहेत.

Local ad 1