RTO कडून आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा

Shashan Aaplya Dari : जिल्ह्यात परिवहन विभागाच्या फेसलेस सुविधेअंतर्गत २०२२ मध्ये २ लाख ६ हजार ४०२ तर सन २०२३ मध्ये ३० हजार १०३ शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. नागरिकांना ऑनलाईनपद्धतीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन विभागाच्या ११० सेवांपैकी २२ सेवा फेसलेस पद्धतीने सुरु करण्यात आल्या असून, नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  RTO कडून आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी फेसलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (Faceless facility for driving license now from RTO)

 

या सुविधेअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सन २०२२ मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ लाख १२ हजार २७८, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत ७७ हजार ४४१ आणि बारामती कार्यालयामार्फत २०२२ मध्ये १६ हजार ६८३ असे एकूण २ लाख ६ हजार ४०२ तसेच सन २०२३ मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १६ हजार ७७५, उप प्रादेशिक परिवहन, पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत १२ हजार ३७४ तर बारामती कार्यालयामार्फत ९५४ असे एकूण ३० हजार १०३ फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेल्या आहेत.

 

परिवहन कार्यालयामार्फत वाहन विषयक व अनुज्ञप्ती विषयक एकूण ११० सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात. वाहन ४.० व सारथी ४.० या दोन संगणक प्रणाली सन २०१७ पासून कार्यान्वीत आहेत. त्यापैकी २२ सेवा फेसलेस पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहन कर, पर्यावरण कर, शुल्क इत्यादी भरण्याकरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध असून या कामाकरिता त्यांना कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही.

 

कशी चालते फेसलेस सुविधा

अर्जदार कार्यालयामध्ये न येता फेसलेस पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करुन घेण्याकरिता कार्यपद्धती खालील प्रमाणे आहे.  https://parivahan.gov.in या संकेतस्थळावरील सारथी प्रणालीवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. सदर अर्ज सादर करतांना प्रथम नविन शिकाऊ अनुज्ञाप्ती हा पर्याय निवडून सबमिट विथ आधार ऑथेंटिकेशन या कळीवर क्लिक करावे. आपल्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल. सदर ओटीपी संगणकावर टाकावा. त्यापुढील संगणकीय खिडकीवर अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड करावी.

 

सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुल्क भरणा करण्यासाठीची खिडकी ओपन होईल, सदर ऑनलाईन शुलक् अदा केल्यानंतर रस्ता सुरक्षे संदर्भातील व्हिडीओची लिंक क्लिक करुन हा व्हिडीओ स्किप न करता संपूर्ण व्हिडीओ पहाणे अनिवार्य आहे. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्तीकरता १५ प्रश्न असलेल्या प्रश्नावली खुली होईल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ असेल. या चाचणीत किमान ९ गुण मिळाल्यास आपणास शिकाऊ अनुज्ञप्ती देण्यात येते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (Regional Transport Officer Ajit Shinde) यांनी दिली आहे.
Local ad 1