पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने रचना इतिहास : तब्बल 35 तास चालली मिरवणूक
पुणे. पुण्यातील गणेशोत्सवाचा समारोप यंदा ऐतिहासिक ठरला. तब्बल 35 तासांहून अधिक काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, दिमाखदार रथ आणि आकर्षक रोषणाईने शहराचे सौंदर्य अधिकच खुलले. भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेशाचे विसर्जन सर्वात शेवटी, रात्री 8:14 वाजता नटेश्वर घाटावर झाले.
मानाचे गणपती आणि प्रमुख मंडळांचा सहभाग
शनिवारी लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडले. मानाच्या पाच गणपतींच्या मंडळांनी जाहीर केलेल्या वेळेनुसार आपापल्या श्रींच्या मूर्तींचे विसर्जन केले. कसबा, तांबडी जोगेश्वरी आणि केसरीवाडा गणपती पालखीतून मिरवणुकीत सामील झाले, तर गुरुजी तालीम आणि तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टने फुलांनी सजवलेले रथ सादर केले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांसारख्या प्रमुख मंडळांचे रथही मिरवणुकीत दाखल झाले.
पुण्यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण फक्त कागदावरच? सीओईपीचा अहवालाने प्रशासनाची पोलखोल
चारही मार्गांवर उत्साह आणि जल्लोष
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्ता या सर्व प्रमुख मार्गांवर गणेशभक्तांचा मोठा उत्साह दिसून आला. संध्याकाळनंतर रोषणाई आणि ‘स्पीकर’च्या दणदणाटाने वातावरण भारले होते, ज्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच उडत्या चालीच्या गाण्यांवर ठेका धरला. मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी, दुपारनंतर हलक्या सरींनी हजेरी लावली, पण पावसातही कार्यकर्त्यांचा जोश कायम होता.
विसर्जन मिरवणुकीची सांगता
कुमठेकर रस्त्यावरील त्रिमुर्ती मित्र मंडळ, केळकर रस्त्यावरील सम्राट मित्र मंडळ आणि लक्ष्मी रस्त्यावरील महाराष्ट्र तरुण मंडळ हे सर्वात शेवटी अलका चौकात दाखल झाले. टिळक रस्त्यावर मंडळांची संख्या अधिक असल्यामुळे मिरवणूक संध्याकाळपर्यंत सुरू राहिली.
राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान
विसर्जनाची आकडेवारी
पुणे महानगरपालिकेच्या माहितीनुसार, यंदा एकूण 6,19,662 गणेशमूर्ती विसर्जनासाठी आल्या होत्या, त्यापैकी 4,43,395 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 1,28,424 मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित झाल्या. सर्वाधिक मूर्तींचे विसर्जन कसबा-विश्रामबाग विभागात (40,549) झाले, तर औंध-बाणेर विभागात कृत्रिम तलावांचा सर्वाधिक वापर (7,881 मूर्ती) करण्यात आला. यंदा 2,38,348 किलो निर्माल्यही संकलित करण्यात आले.