पुणे महापालिकेचा अजब कारभार ; सिद्धेश्वर घाटा जवळील पूल पाडला पण राडारोडा मुठा नदीपात्रातच ठेवला !
यंत्र उपलब्ध नव्हते, त्यामुळे राडारोडा त्वरित काढता आला नाही - प्रशासन
पुणे, १७ जून: शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील मुठा नदीवरील पादचारी पूल पुणे महापालिकेने हटवला असला, तरी त्याचा राडारोडा अजूनही नदीपात्रातच टाकलेला आहे. यामुळे नदीप्रवाहात अडथळा निर्माण होऊ लागला असून, जलपर्णी आणि कचरा अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. (pune siddheshwar ghat bridge debris in river)
ओंकार कदमवर अखेर गुन्हा दाखल | PMC महिला डॉक्टर छळ प्रकरणात पोलिसांची कारवाई
सुमारे ५५ वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल जीर्ण झाल्याने महापालिकेला दरवर्षी मोठा खर्च करावा लागत होता. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट नंतर पूल हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी पूल हटवण्याचे काम सुरू झाले. मात्र, राडारोडा आणि लोखंडी रॉड, मुरम, माती, संरचनांचे अवशेष नदीपात्रातच टाकले गेले आहेत.
स्थानिक नागरिक या पुलाचा वापर कपडे धुणे, मासेमारी आणि प्राणी स्वच्छतेसाठी करत होते. आता या ठिकाणी जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकू लागल्या आहेत, जे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंतेची बाब आहे.
या प्रकरणी पुणे महापालिकेचे मुख्य भवन अभियंता युवराज देशमुख म्हणाले, “पाण्यात उतरून काम करणारे यंत्र उपलब्ध नव्हते, त्यामुळे राडारोडा त्वरित काढता आला नाही. मात्र, योग्य यंत्र मागवण्यात आले असून लवकरच संपूर्ण राडारोडा आणि उर्वरित अवशेष हटवले जातील. हे काम महापालिकेच्याच यंत्रणेद्वारे होणार असल्याने कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही.” (pune siddheshwar ghat bridge debris in river )