देशातील पहिली ‘क्रीडा नर्सरी’ पुणे महापालिका सुरू करणार
पुणे. लहान मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका देशातील पहिली ‘क्रीडा नर्सरी’ सुरू करणार आहे. हडपसर येथील सुमारे तीन एकर आरक्षित जागेवर डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही नर्सरी कार्यान्वित होणार आहे.
महापालिकेने २०१३ मध्ये आखलेल्या क्रीडा धोरणात या उपक्रमाचा समावेश करण्यात आला होता. २०१८ मध्ये या धोरणात सुधारणा करून क्रीडा नर्सरीला अधिक स्पष्ट रूप देण्यात आले. क्रीडा विभाग प्रमुख किशोरी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सरीमध्ये ३ ते १२ वयोगटातील मुलांना सकाळी आणि संध्याकाळी दोन सत्रांमध्ये खेळ प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुलांना ३–७ व ८–१२ अशा दोन गटांमध्ये विभागले जाणार आहे.
हडपसरमध्ये ३ एकर जागेत विविध मैदाने
मगरपट्टा, हडपसर येथील स.नं. १३५/६ + १३७/४ या तीन एकर जागेवर ही नर्सरी उभारण्यात येणार आहे. ही जागा महापालिकेच्या ताब्यात असून, ती नुकतीच क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. येथे विविध मैदानी खेळांसाठी मैदानांची उभारणी केली जाईल. सुमारे ३ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी १ कोटींचा निधी सध्या मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित निधीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
का गरज आहे क्रीडा नर्सरीची?
स्मार्टफोन, डिजिटल गेम्स आणि तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली आजची मुले मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. वाढलेली एकलकोंडीत, चिडचिडेपणा आणि सामाजिक संवादाची कमतरता यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास अडथळलेला आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीच पुणे महापालिकेने ‘क्रीडा नर्सरी’सारखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळातून करिअरकडे वाटचाल
खेळ हे केवळ छंद न राहता आता करिअरचा पर्याय बनले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना मिळणारी संधी, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण यामुळे अनेक पालक व पाल्य खेळाकडे आकर्षित झाले आहेत. मात्र कोणता खेळ निवडावा, त्यामध्ये प्राविण्य कसे मिळवावे – या बाबत शहरातील पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही क्रीडा नर्सरी उपयुक्त ठरणार आहे.