पुणे : लोणावळा-मावळ पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत बंदी ; जिल्हाधिकाऱ्यांनी का घेतला हा निर्णय ?
मद्यपान, वाहतूक व ध्वनीप्रदूषणावर निर्बंध
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी, तसेच यामुळे निर्माण होणारे अपघात, कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न आणि पर्यावरणीय हानी यांचा विचार करता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी लोणावळा व मावळ परिसरातील विविध पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. (lonavala mawal tourism ban monsoon 2025)
आषाढी वारी २०२५ : पालखी तळावरील बारा ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीने खास मंडप उभारणी
लोकप्रिय पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष
लोणावळा परिसरातील एकविरा देवी मंदिर, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, तसेच पवना धरण या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. पावसामुळे धबधबे, ओढे व जलप्रवाह अधिक तीव्र होत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय काही ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उभा राहतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
निसर्गाच्या रौद्र रूपात धोक्याची शक्यता
पावसाळ्यात उंचावरून पडणारे धबधबे, वेगाने वाहणारे पाण्याचे प्रवाह, तसेच ओल्या व चिकट पायऱ्या व कठडे यामुळे पर्यटकांना अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे धबधब्याच्या प्रवाहात उतरणे, पोहणे, पाण्याखाली बसणे, तसेच दऱ्यांजवळील कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढणे किंवा चित्रीकरण करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय धोकादायक वळणे, चढाव व उतार याठिकाणीही विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. (lonavala mawal tourism ban monsoon 2025)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झोकून देऊन काम करा : अजित पवार
मद्यपान व अश्लील वर्तनावर बंदी
धबधब्यांच्या परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, वाहतूक करणे अथवा विक्री करणे यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उघड्यावर मद्य सेवन केल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. महिलांबाबत असभ्य वर्तन करणे, शेरेबाजी करणे, अश्लील हावभाव करणे किंवा टिंगलटवाळी केल्यासही संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ध्वनी व पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण
पर्यटनस्थळी मोठ्या आवाजात गाणी वाजविणे, डिजे, वूफर, गाड्यांतील स्पीकर मोठ्या आवाजात वाजविणे, त्यामुळे ध्वनीप्रदूषण निर्माण करणे यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक, काच, थर्माकॉलचे साहित्य, खाद्यपदार्थ व कचरा फेकण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी हे आदेश काटेकोरपणे अंमलात आणले जाणार आहेत.
वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण
धबधबे, धरणे, नद्यांचे काठ व इतर पर्यटनस्थळी सर्व प्रकारच्या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी दिली जाणार आहे. याशिवाय रस्त्यांवर वाहन थांबवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक ओव्हरटेक करणे यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
उल्लंघनास दंड व कारवाई
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा संघटनांवर भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ नुसार कारवाई केली जाईल. या अंतर्गत दंड अथवा इतर कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे. (lonavala mawal tourism ban monsoon 2025)