पुण्यात सुरू होणार आयआयएम मुंबईचे नवीन केंद्र, शैक्षणिक व उद्योजकतेला मिळणार नवी आयाम
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर
पुणे: पुण्याच्या शैक्षणिक ओळखीला आता नवा टप्पा मिळणार आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था आयआयएम मुंबई चे केंद्र आता पुण्यात सुरु होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर संस्थेच्या डीन कमिटी व अकादमिक काउंसिलने मान्यता दिली आणि निर्णय अधिकृत झाला. (IIM Mumbai Launches New Pune Campus)
नवरात्र 2025 : देवीच्या घटस्थापनेचा मुहूर्त, पूजा विधी आणि उपवासाची माहिती
पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्यासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक व औद्योगिक परंपरेतील ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. पुणे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत असून, येथे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे, अत्याधुनिक संशोधन-विकास केंद्रे, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि “Oxford of the East” अशी शैक्षणिक ओळख आहे. या पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस शहरासाठी नैसर्गिक पूरक ठरेल आणि जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या दाराशी आणेल.
कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवा प्रोत्साहन मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पना यशस्वी व्यवसायांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. हा उपक्रम स्वावलंबी भारत व विकसित भारत 2047 या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देईल.
आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, “शैक्षणिक वर्ष 2026 पासून पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम आणि अल्पकालीन कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभार मानतो; या केंद्रामुळे विकसित भारत 2047 मध्ये महत्त्वाचे योगदान देता येईल.”
“पुणे आणि मुंबईमध्ये Knowledge Corridor तयार होणार आहे. मुंबई आर्थिक राजधानी, तर पुणे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन शहरांमधील Knowledge Corridor देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी पर्वणी ठरेल. यामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल व विद्यार्थ्यांसमोर संधींचा विस्तृत क्षितिज खुले होईल.”- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री