EB-5 Visa India । अमेरिकेच्या व्हिसासाठी ‘ईबी-५’चा पर्याय : कशी मिळते ग्रीन कार्डची संधी
EB-5 Visa India। पुणे : अमेरिकेच्या कडक व्हिसा धोरणांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी ‘ईबी-५ इमिग्रंट इन्व्हेस्टर प्रोग्रॅम’ हा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. या व्हिसाअंतर्गत भारतीयांना अमेरिकेत रोजगारनिर्मितीसाठी ८ लाख अमेरिकी डॉलर (भारतीय चलनात सुमारे सहा ते सात कोटी रुपये) गुंतवावे लागतात. ही गुंतवणूक दोन वर्षांत परत मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर ग्रीन कार्ड मिळण्याचा मार्गही मोकळा होतो. गेल्या ३० वर्षांपासून अमेरिकेत इमिग्रेशन ॲटर्नी म्हणून कार्यरत असलेले नदादूर कुमार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
कुमार म्हणाले, “सध्या अमेरिकेत गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे. ‘ईबी-५’ प्रोग्रॅमद्वारे रोजगारनिर्मिती करून नागरिकत्व आणि ग्रीन कार्डचा मार्ग खुला होतो. मात्र, भारतातील इमिग्रेशनसाठीची मागणी फार मोठी असल्यामुळे ही संधी मर्यादित काळापुरतीच असू शकते.” अमेरिकी इमिग्रेशन कायद्यानुसार ग्रीन कार्डसाठी प्रत्येक देशाला जास्तीत जास्त ७ टक्के कोटा राखीव असतो. परंतु भारताची मागणी H1-B, F-1 व EB-5 या सर्व व्हिसा श्रेणींमध्ये प्रचंड आहे.
भारतीय गुंतवणूकदारांची वाढती मागणी
अनेक H1-B आणि F-1 व्हिसाधारकांनी आपली आर्थिक प्रगती करून आता ‘ईबी-५’चा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या शहरांसह लहान शहरांतील गुंतवणूकदारही आता या मार्गाने प्रयत्न करत आहेत. एका कुटुंबाऐवजी अनेक कुटुंबे एकत्र येऊन निधी उभारणी करून अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे ‘ईबी-५’ हा पर्याय केवळ उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही.
भारतीय विद्यार्थ्यांची परिस्थिती
भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना मोठी मागणी आहे. मात्र, विद्यार्थी व्हिसा धोरण बदलले नाही तर भारतीय विद्यार्थी कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांकडे वळू शकतात, असेही कुमार यांनी सांगितले.