नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट काय झाले असेल तर, यशोमती ठाकूर ताईला अपयश आले. ताईला भेटण्यासाठी मी अमरावतीला गेलो होतो. ताईची भेट काही कारणास्तव लांबणीवर गेली. पुढचे दोन दिवस या भागातल्या भेटीगाठी करायच्या, या उद्देशाने मी मेळघाटच्या दिशेने निघालो. मेळघाटमधल्या (Melghat) काही ओळखीतल्या लोकांशी संपर्क केला, तर ते सारे कामात होती. ‘वैभवभाई’ मेळघाटात आहेत, त्यामुळे यावेळी भेटणे शक्य नाही. असे दोन तीन जणांकडून निरोप आले. कोण ‘वैभवभाई’? असे विचारेपर्यंत शेवटच्या व्यक्तीने ही फोन ठेवला. मेळघाटामधल्या घटांग, मसुंडी, बेला, कोहना, जैता देही, बिहाली, हत्तीघाट, सलोना, भवई अशा अनेक गावांत मी गेलो. त्या ठिकाणी गेल्यावर माझ्याशी परिचित असणारी व्यक्ती मला हेच सांगत होती. ‘वैभवभाई’ आताच येऊन गेले. कुठे किराणा सामान दिले. कुठे कपडे दिले. कुठे शाळेचे साहित्य, कुठे घरात लागणारे साहित्य, तर कुठे अन्य काही साधनसामुग्री दिली. बापरे, कोण आहे हा माणूस,? जो या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या भागात एवढे मोठे काम करतो, असा मला प्रश्न पडला होता. माझ्यासोबत याच भागातले किशन जांभोरी होते. मी त्यांना विचारले, ‘मामा हे ‘वैभवभाई’ कोण आहेत,? त्यांनी मला वैभव यांच्याविषयी सांगितले. मी त्यांना म्हणालो, ‘लावा बरं फोन त्यांना’. मामाच्या फोनवर मी वैभवजी यांना बोललो. एक माणूस नि:स्वार्थीपणे या भागात काम करतोय, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते. एका तासानंतर आमचे भांद्री या गावात भेटायचे ठरले. आम्ही भेटलो. खूप गप्पा झाल्या आणि वैभवचे कधीही कोठे न दाखवलेले खूप मोठे सामाजिक कामही माझ्या पुढे आले. काय काही काही माणसे असतात, जी प्रचंड मोठे काम करतात. त्यात वैभव एक होते. (Bhramanti LIVE Story – Sandip Kale)
वैभव वानखडे (९४२३४०१०००) (Vaibhav Wankhade) अकोला येथील आदर्श कॉलनीमधला एक युवक. वैभवचे आजोबा आणि वडील हे सेवाभावी वृत्तीने प्रचंड झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. ‘आपला जन्म देण्यासाठी झाला’ हा विचार वैभव यांच्या मनात लहानपणापासून अगदी शिगोशीग भरला होता. वैभव म्हणाले, माझे वडील गेल्यावर अनेक मित्रांच्या मदतीने उभा केलेला खूप मोठा व्यवसाय तसाच बाजूला ठेवून बाबांच्या आठवणीत पूर्णवेळ सेवाभावी कार्यात स्वतःला झोकून द्यावं असा विचार करून मी बाहेर पडलो. एका वर्षाने मागे फिरून पाहिले तर ज्या अनेकांची भिस्त माझ्या व्यवसायावर होती, त्यांचे कुटुंब उघड्यावर पडायची वेळ आली होती. मी स्वतःला थोडे सावरत, थोडा व्यवसाय आणि अधिकचे सेवाभावी कार्य असे काम सुरू केले. जसे माझे आजोबा आणि वडील यांना ‘आत्मिक वैभवा’ची रुची निर्माण झाली होती, तशी रुची मलाही लागली होती. सर्व जण माझी काळजी करायचे. एकटी माझी आई मीरा वानखडेला सारखे वाटायचे, माझा मुलगा प्रत्येक पाऊल धाडसाने टाकतो. आई जेजे म्हणायची ते ते व्हायचं. एका महिलेकडे आणि युवकांकडे बोट करीत वैभव म्हणाले, ‘ही माझी पत्नी पूनम, आणि हा गौरव काटेकर हे दोघेंजण राज्यातील गरीब मुलांचे शिक्षण, गरिबी निर्मूलन उपक्रम, आणि मराठी शाळा या तिन्ही उपक्रमांचे काम पाहतात. ‘मी वैभव यांना म्हणालो, हे तिन्ही उपक्रम आहेत तरी काय’?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी “त्या’ माजी नगरसेवकांचे तोंड बंद करावे – उदय सामंत
वैभव म्हणाले, २०१२ ला मी ‘नि:स्वार्थ सेवा फाउंडेशन’ आणि ‘सेवा बहुउद्देशीय संस्था’ अशा दोन संस्था काढल्या. माझे बाबा गेले आणि बाबांच्या आठवणीत २०१९ पासून या दोन्ही संस्थांच्या कामाला प्रचंड गती मिळाली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून नि:स्वार्थ सेवा होत आहेत, हे कळल्यावर राज्यातून शेकडो तरुण या कामासाठी पुढे आले. मेळघाटसारखे राज्यातले २८ गरिबी आणि भीषण संकटे असणारे भाग आम्ही निवडले. तिथे प्राथमिक स्वरूपात जे काही पाहिजे ते पुरवले. गरिबी फार वाईट असते, या काळात जो कुणी साथ देतो, तो देवापेक्षा मोठा वाटायला लागतो. माझ्या बाजूला असलेल्या एका महिलेकडे खुणावत वैभवजी मला म्हणाले, ‘ही अंजना याच मेळघाट भागातली. तिची सात मुले दगावली. कुपोषण, रोगराई, अज्ञान अशी कारणे त्या सात मुलांच्या जाण्यामागे सांगण्यात आली. माझ्या दृष्टीने ही मुले जाण्यामागे खरे कारण होते गरिबी. आता अंजना सोबत जो मुलगा उभा आहे. तो तिचा मुलगा शिवा आहे’. मी अंजनाकडे पाहत म्हणालो, ‘शिवा तर मला एकदम पैलवान वाटतो’. डोळ्यात आलेली आसवं पुसत अंजना म्हणाली, ‘दादा, कुठे तरी देव हाय ना जी’..! आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेला मांसाचा गोळा जेव्हा डेडबाॅडी होऊन आपल्याच हातावर असतो ना, तेव्हा त्या आईला धरणीमाय जागा देत नाही. त्या आईचा आक्रोश कुणालाही दिसत नाही, तो आतला आक्रोश फार भयंकर असतो. माझ्या तिसऱ्या बाळापासून वैभवदादांची ओळख झाली. एक तरी बाळ वाचेल असे वाटत होते, पण छे !
आठव्या बाळंतपणाच्या वेळी पूनमवहिनी आणि वैभवदादा मला त्यांच्या घरी अकोल्याला घेऊन गेले. चांगल्या दवाखान्यात माझी प्रसूती झाली. पुढे वैभव भाऊने अनेक फिरते दवाखाने या भागात सुरू केले. ज्यातून माझ्यासारख्या अनेक अंजनाला त्यांचे मातृत्व मिळाले. आम्ही बोलत, बोलत त्या मेळघाटातल्या भागात वैभव यांच्यामुळे झालेल्या अनेक सामाजिक कामांचे दाखले अनुभवत होतो. वैभव यांनी गौरव काटेकर, तृप्ती महाले, पूनम कीर्तने, गिरीश आखरे, वैशाली जोशी, अशा अनेकांची ओळख करून दिली. चर्चेतून आमचा रस्ता ‘अमरावती’च्या दिशेने कटत होता. ३४० जणांची पूर्णवेळ काम करणारी टीम, हे तिन्ही उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवत होती. मेळघाटामध्ये गरिबी निर्मूलन उपक्रम, शाळाबाह्य मुलांसाठी उभे केलेले वैभव यांचे काम पाहून कोणीही थक्क होईल, असे ते काम होते. या स्वरूपाचे काम केवळ मेळघाटामध्ये नव्हते तर, राज्यात छत्तीस जिल्ह्यात सुरू होते. अगदी कुठलाही गाजावाजा न करता. आमच्या गाडीत वैभव यांनी सुरू केलेल्या त्या तिन्ही उपक्रमांविषयी चर्चा सुरू होती. आता ‘मराठी शाळा वाचली पाहिजे’ या उपक्रमाविषयी समजून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. वैभव म्हणाले, ‘आपण सारे आपल्या मराठी शाळेत शिकलो’. कसे वागायचे, जगायचे हे सारे संस्कार आम्हाला मराठी शाळेने शिकवले. अशा जीव की, प्राण असणाऱ्या शाळा वाचाव्यात यासाठी आम्ही राज्यभरात सर्व्हे करून एक रूपरेषा ठरवली. सर्व राज्यांत २४० शाळा निवडल्या, ज्या शाळेतून बाहेर पडणारी दीड लाखाहून अधिक मुले दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन आभाळाला गवसणी घालायचे काम करतात. कोण किती वाईट आहे, यंत्रणा किती कामचुकार आहे, यात आम्ही कधीही घुसत नाही. आम्ही आमचे ठरवलेले काम करतो.आम्ही अमरावतीजवळच्या घटांग या शाळेत पोहचलो. त्या त्या शाळेतले अनेक प्रयोग वैभव आणि त्यांची टीम मला सांगत होती. तिथे असणाऱ्या श्रीजया, विजया, कान्होपात्रा या तिन्ही बहिणी एका पाठोपाठ नवोदय ला लागल्या. त्यांचे वडील साधी पानपट्टी चालवतात. त्या शाळेत कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. कोणी खेळाची. कुणी छान कविता लिहितो. हे याच शाळेत का पाहायला मिळत होते, त्याचे कारण या शाळेत वैभव आणि त्यांच्या टीमने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून अनेक उपक्रम विकसित केले होते. या घटांगच्या शाळेसारख्या राज्यात २४० शाळांमध्ये लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायचे आहे त्यांच्या ‘वैभवभाई’ यांना. आभार मानणारे पालक, शिक्षक, विद्यार्थी त्यांच्या पुढे अगदी साधेपणात नतमस्तक झालेले वैभव, त्या शाळेतला सारा प्रसंग मी अगदी डोळे भरून पाहत होतो. वैभव यांच्या सर्व टीमने त्या शाळेतील कामामध्ये स्वतःला गुंतवले होते. बाजूला मी आणि वैभव दोघे बोलत बसलो होतो.
वैभव म्हणाले, ‘माझे आजोबा कृष्णराव वानखडे यांनी पदरमोड करून आणि लोक वर्गणीतून बहुजनांच्या मुलांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. या काळात आपण नव्या शाळा काढू शकत नाही, पण आहे त्या शाळा चांगल्या करू शकतो. वडिलांचेही माझ्याविषयी खूप स्वप्न होते. वडिलांच्या आठवणीतून डोळे पाणावलेल्या वैभव यांचे लक्ष एका उत्साहाने धावत येणाऱ्या मुलीकडे गेले. ती मुलगी ‘बाबा’ म्हणत, वैभव यांच्या गळ्यात येऊन पडली. तिने वैभवच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू पुसले. ती मुलगी म्हणाली, ‘तुम्हाला कोणाची आठवण येते?, माझ्या आजोबांची की तुमच्या आजोबाची?. वैभव काहीच बोलले नाहीत. त्यांनी पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडले. त्या दोघांचेही डोळे अश्रूनी भरली होती. एकमेकांच्या स्पर्शातून त्यांचे बोलणे सुरू होते. थोडे भानावर येत वैभव मला म्हणाले, ‘ही माझी मुलगी शिवन्या. शिवन्या आणि माझी आई आताच मुंबईवरून आलेत. या दोघींनाही माझ्या सामाजिक कामात प्रचंड रुची आहे’. वैभव यांच्या आईची ओळख झाली. बऱ्याच गप्पा झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. वैभव यांच्या आईच्या पायावर मी डोके ठेवत आईला म्हणालो, ‘आई, अनेक जन्म साधना केल्यावर तुम्हाला असा पुत्र मिळाला असेल’. माझे बोलणे ऐकून आईचे डोळेही पाणावले होते. मी निघालो. थोडे पुढे गेल्यावर मलाही अश्रू आवरेनात. माझे अश्रू त्या ‘आत्मिक वैभवा’साठी होते, ज्याला वाटते सगळीकडे ‘चिरंतन टिकणारा’ विकास झाला पाहिजे. ज्यांना वाटते, सगळीकडे चांगले झाले पाहिजे. तुम्हालासुद्धा हे ‘आत्मिक वैभव’ मिळायचे असेल तर, तुम्ही नक्की ‘वैभव’च्या पावलावर पाऊल टाका, बरोबर ना..!