गंगाखेडमध्ये शेतकऱ्याने महसूल सहाय्यकाला दाखवला हिसका ; 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने केली अटक

परभणी : चांगेफळ गावातील गट क्रमांक 68 मधील शेतजमीन जालना – नांदेड समृद्धी महामार्ग करिता एका शेतकऱ्याची संपादित झाली आहे.55 वर्षिय तक्रारदार यांना सदर शेत जमिनीचा मोबदला मंजूर झाला असून, त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. शेत जमिनीतून जाणारे पाइपलाइनची नुकसान भरपाई करिता नोंद करण्यात आली नाही. ती करण्यासाठी गंगाखेड उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यकला 50 हजारांची लाच घेताना परभणी अँटी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. तसेच एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (The ACB team arrested the revenue assistant while accepting a bribe of Rs 50 thousand)

 

महसूल सहाय्यक अमोल बालाजी खेडकर (वय 47 वर्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय,गंगाखेड. राहणार संत जनाबाई नगर, गंगाखेड ता.गंगाखेड जि.परभणी वर्ग ३ (महसूल विभाग) याला अटक करण्यात आली आहे. तर खाजगी इसम दादाराव मारोतीराव गडगिळेे (वय 35 वर्षे, व्यवसाय शेती, रा. चांगेफल तालुका पूर्णा जि.परभणी ) याचा शोध सुरु आहे.

 

 

तक्रारदार यांना मंजूर झालेला संपादित शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाइपलाइनचे नुकसान भरपाईचे कामासाठी अमोल खेडकर यांनी दादाराव गडगिळे यांचे मार्फतीने तक्रारदार यांना गंगाखेड येथे उप विभागीय अधिकारी कार्यालय येण्याकरिता निरोप देऊन बोलावून घेतले होते. तेंव्हा त्यांना खेडकर यांनी त्यांच्या प्रलंबित कामाकरीता 50,000 रू लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांचेकडे पैसे नसल्याने त्यांनी लाच दिली नाही.यासंदर्भात दि.30 सष्टेंबर रोजी एसीबी परभणी येथे आरोपी लोकसेवक अमोल खेडकर व खाजगी इसम दादाराव गडगिळे यांचे विरुद्ध तक्रार दिली.

 

 

रविवारी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचमागणी पडताळणी कारवाई मध्ये खाजगी इसम दादाराव गडगिळे यांनी तक्रारदार यांचे शेतजमिनीचा मंजूर मोबदला त्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी अमोल खेडकर यांचे समक्ष 1,00,000 रू लाचेची मागणी केली. तडजोडी अंती खेडकर यांनी सदर कामासाठी 50,000 रू लाचमागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. सोमवारी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान अमोल खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडून 50,000 रुपये लाच स्विकारली आहे. खेडकर यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. आरोपी खाजगी इसम दादाराव गडगिळे यांचा शोध घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे. पो.स्टे.गंगाखेड जि.परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

 

परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी क्रमांक
02452-220597, टोल फ्रि क्रं. 1064

 

Local ad 1