स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ
पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही, स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही, याचे अधिकार देणायात आले आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी स्पष्ट केले. यामुळे प्रत्येक ठिकाणी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात सपकाळ म्हणाले की, “स्थानिक पातळीवरील निर्णय अधिकार स्थानिक नेत्यांकडे असून मित्रपक्षाबरोबर आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक नेत्यांद्वारे घेण्यात येईल. निरिक्षक, जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांचा सहभाग असेल.”
सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्यास स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होतात. काही वेळा सक्षम उमेदवार असताना जागा दुसऱ्या पक्षाकडे जाते. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह ‘पंजा’ अनेक भागात दिसत नाही.” ते म्हणाले की, काँग्रेस आता ‘मास बेस’ पक्षापासून ‘केडर बेस’ पक्षात रूपांतरित होण्याचा प्रयत्न करत आहे.
सपकाळ म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपेक्षा स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतले जातील. स्थानिक नेत्यांना आघाडी करायची की नाही, याचा संपूर्ण अधिकार देण्यात आला आहे. प्रत्येक प्रकरणाचा फॉलो-अप करून समाधान मिळेल याची खात्री केली जाईल.”
काँग्रेसची धोरणात्मक तयारी
सपकाळ यांनी पत्रकारांसमोर काँग्रेसच्या स्थानिक निवडणूक धोरणाबद्दल सांगितले की, “ज्यावेळी आपण स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणूक लढवतो, तेव्हा पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साही राहतात. ही धोरणात्मक पद्धत आपल्या कामगिरीस अधिक परिणामकारक बनवेल.”