...

कोंढव्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना : ९ वी व १० वीच्या वर्गांना अखेर मंजुरी

आपचे एम. अली सय्यद यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : कोंढवा हा मुस्लिम बहुल भाग असून येथील मुलींना इयत्ता ८ वी नंतर शिक्षणात अडथळे निर्माण होत होते. पुणे महापालिकेच्या तीन शाळांमध्ये फक्त ८ वीपर्यंतचे वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी भवानीपेठ येथे ८ ते १० किमी अंतर पूर्ण करुन जावे लागत होते. दररोजचा प्रवास, वाहतूक खर्च आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे अनेक पालक मुलींचे शिक्षण थांबवत होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम आदमी पार्टीचे (AAP) अल्पसंख्याक विभाग प्रमुख व शहराध्यक्ष एम. अली सय्यद यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून कोंढव्यातील महापालिका शाळांमध्ये ९ वी व १० वीच्या वर्गांना मंजुरी मिळाली आहे.

 

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळा (112 ब), अब्दुल कलाम आझाद शाळा (209 ब) आणि बापूसाहेब दरेकर शाळा (175 ब) या शाळांमध्ये आतापर्यंत फक्त ८ वीपर्यंतचे वर्गच होते. मुलींना ९ वी–१० वीचे शिक्षण घेण्यासाठी परिसरापासून ७-८ किमी दूर जावे लागत होते. प्रवासात होणारा वेळ, अतिरिक्त खर्च आणि सुरक्षेची चिंता यामुळे गरीब पालक मुलींचे शिक्षण अर्धवट थांबवत होते.

५ डिसेंबर २०२४ रोजी एम. अली सय्यद यांनी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालयाला ९ वी व १० वी वर्ग सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र मंजुरीसाठी महापालिकेच्या स्थायी समिती व मुख्य सभेची प्रक्रिया दीर्घकाळ लांबली. शिक्षण विभागातील दिरंगाईविरोधात सय्यद यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

 

शेवटी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी सय्यद यांची बाजू मान्य केली. स्थायी समिती व मुख्य सभेत वर्गांचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार यंदा (२०२५-२६ शैक्षणिक वर्षात) ९ वीचे वर्ग सुरु होणार आहेत, तर पुढील वर्षी १० वीचे वर्ग सुरू होतील.

 

कोंढव्यातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना महागड्या खाजगी शाळा व बस भाडे परवडत नाही. पीएमसीच्या शाळा त्यांच्या आवाक्यात आहेत. विशेषतः मुलींना आता आपल्या भागातच शिक्षण मिळणार असल्याने पालकांनाही दिलासा मिळाला आहे.

 

 

कोंढवा भागातील काही माजी नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला होता. मात्र सय्यद यांच्या ठाम भूमिकेमुळे अखेरीस हा प्रस्ताव मंजूर झाला. यामुळे कोंढव्यातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

 

Local ad 1