धायरीतील स्वानंद प्राथमिक विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा
पुणे, स्वानंद प्राथमिक विद्यालय व बालक मंदिर, धायरी येथे शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्त्री सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री वाघमारे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे सर, प्रबोधिनीचे सचिव संतोष पवार, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
प्रमुख पाहुण्या राजश्री वाघमारे यांच्या हस्ते शाळेतील सर्व शिक्षिका, सहायक व सेवक वर्गाचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करणारी वाक्ये स्टिकी नोट्सवर लिहून फलकावर सजवण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना थेट प्रश्न विचारले व त्याची समर्पक उत्तरे मिळवली. वातावरणात उत्साह आणि आनंदाचे रंग भरले.
यावेळी प्रमुख पाहुण्या वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आई आणि शिक्षिका या दोन व्यक्तिमत्वांचा जीवनावर सर्वाधिक प्रभाव असल्याचे सांगितले. मोबाईल वापर कमी करणे, वाचनाची सवय लावणे, खेळाची आवड जोपासणे, सत्य बोलणे, अन्यायाला विरोध करणे यासारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींची शिकवण त्यांनी दिली. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी बालसभा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निलिमा निगडे यांनी केले.