...

उपजीविका, कला आणि शाश्वततेचा उत्सव पुण्यात सुरू

ग्रामीण भारत महोत्सवाला सुरुवात

पुणे, १८ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील क्रिएटिसिटी, येरवडा येथे आजपासून १८ व्या यलो रिबन स्वयंसेवी संस्था मेळा (YRNF) – ग्रामीण भारत महोत्सवाला सुरुवात झाली आहे. इशान्या फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा पाच दिवसीय मेळा १८ ते २२ सप्टेंबर २०२५ या काळात सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. या वर्षीच्या मेळ्याची संकल्पना “Explore, Embrace, Evolve” अशी असून, यामध्ये देशभरातील कारागीर, शेतकरी, विणकर आणि स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेली ३,००० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. उद्घाटन स्वदेश फाउंडेशन च्या सहसंस्थापक झरीना स्क्रूवाला, इशान्या फाउंडेशनच्या विश्वस्त पारुल मेहता आणि नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दराड) यांच्या हस्ते पार पडला. (Yellow Ribbon NGO & Artisan Fair Pune)

 

 

 

 

झरीना स्क्रूवाला यांनी या मेळ्याला ‘सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी बाजारपेठ’ असे संबोधले. त्या म्हणाल्या, “इथे केलेली प्रत्येक खरेदी ही शेतकऱ्यांना, महिलांना आणि कारागिरांना मदत करते, ज्यामुळे संपूर्ण समाजाला बळ मिळते.”

 

पारुल मेहता यांनी गेल्या १७ वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करत सांगितले की, हा मेळा एका छोट्या उपक्रमातून पुण्यातील एक महत्त्वाचा वार्षिक कार्यक्रम बनला आहे. त्यांनी या प्रवासात सोबत असलेल्या नाबार्ड आणि इतर भागीदारांचे आभार मानले.

 

रश्मी दराड यांनी सांगितले की, “हा मेळा ग्रामीण कारागीर आणि शहरी ग्राहकांना जोडणारा एक उत्तम दुवा आहे. अशा उपक्रमांमुळे आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना मिळते.”

 

मेळ्याचे खास आकर्षण

हा मेळा केवळ खरेदीपुरता मर्यादित नाही, तर तो कुटुंबासाठी एक परिपूर्ण अनुभव आहे. इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळांचा अनुभव मिळेल. प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढला जाईल. मुलांसाठी खास ट्रॅम्पोलिन पार्क आणि प्ले झोनची व्यवस्था आहे. प्रत्येक स्टॉलमागे महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, सेंद्रिय शेती किंवा दिव्यांगांना मदत अशा प्रेरणादायी कथा आहेत. हा मेळा म्हणजे व्यापार, संस्कृती आणि समुदायाचा एक अनोखा संगम आहे. वैयक्तिक वापरासाठी, सणांसाठी किंवा कॉर्पोरेट भेटवस्तूंसाठी इथे प्रत्येकासाठी काहीतरी खास उपलब्ध आहे.

 

 

Local ad 1