पुणे. महापालिकेच्यावतीने नागपूरच्या धर्तीवर शहराच्या एन्ट्री पॉईंटवर अत्याधुनिक वातानुकुलीत सात व्हीआयपी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आले असून, 2025-26 वर्षाच्या अंदाजपत्रात (Pune Municipal Corporation Budget for the year 2025-26) निधीची तरतूद करण्यात आली आहे. ‘पे अँन्ड यूज’ सूत्रांनुसार उभारण्यात येणारी ही स्वच्छतागृह प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतील. (VIP toilets now available for passengers at Pune entry point)
पुणे मनपाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 12 हजार 618 कोटी रुपयांचा अंदाजपत्रक मनपा आय़ुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले (Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) यांनी स्थायी समितीसमोर मांडला. त्याला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी डॉ. भोसले यांनी व्हीआयपी स्वच्छतागृह उभारले जाणार असल्याची घोषणा केली असून, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली होती. शहराच्या सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, आहील्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्टेशन जवळ अशा ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. एका स्वच्छतागृहासाठी साधारण 50 ते 70 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ही स्वच्छतागृह उभारणे आणि त्यांची देखभाल करणे यासाठीच्या विविध पर्यायांसह इच्छुकांकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. स्वच्छतागृहाची उभारणी आणि देखभाल दुरूस्तीसाठी उत्पन्नाचे पर्याय म्हणून याठिकाणी संबधिताला जाहिरातींचे हक्कही दिले जाणार आहेत.
कशी असतील स्वच्छतागृह
स्वच्छतागृहांमध्ये वातानुकुलीत यंत्रणा असेल. आंघोळीसाठी अद्ययावत बाथरूमची व्यवस्था तसेच चेजींग रुम आणि प्रसाधनगृहही असेल. मोबाईल, लॅपटॉप चार्जींगची तसेच वायफाय सुविधा असेल. महिला आणि पुरूषांसह तृतीयपंथी देखिल याचा वापर करू शकेल, अशी सुविधा असेल. अपंगांना तेथे सुरक्षितरित्या पोहोचता येईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. येथे केअर टेकर सोबतच स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असतील.
अजीत पवारांनी केली सूचना
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजीत पवार यांचे शहराच्या विकासकामांवर लक्ष असते. ते वेळोवेळी मनपा अधिकाऱ्यांना सूचना करत असतात. त्यांनी नागपूरच्या धर्तीवर पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘व्हीआयपी’ स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार पुणे मनपाचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अंदाजपत्रकात याचा समावेश करुन त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.
सहा महिन्यांत पूर्ण होणार
शहरात प्रवेश करणारे पाच आणि रेल्वे स्टेशन आणि लोहगाव विमानतळ येथे हे स्वच्छतागृह उभारले जाणार आहेत. हे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे.
– संदीप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थान पुणे मनपा. – Pune Municipal Corporation Deputy Commissioner Solid Waste Management Sandeep Kadam