महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत
बचाव पक्षाचा अजब दावा : “पोलिस आयुक्तांनाही बेलबाग चौकात धक्काबुक्की होऊ शकते”
पुणे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात एका २० वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी पत्रकाराचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. ढोल-ताशा पथकातील दोन सदस्यांनी पत्रकार तरुणीला धक्काबुक्की करून रस्त्यावर ढकलले. फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन्ही आरोपींना अटक केली.
न्यायालयीन सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींची नावे अनोज बबन नवगिरे (३४, राहणार मंगळवार पेठ, पुणे) आणि चिराग नरेश किराड (२४, राहणार लाल देऊ सोसायटी, पुणे) अशी आहेत. हे दोघे त्रिताल ढोल-ताशा पथकाचे सदस्य असल्याचे समोर आले.
सरकारी वकिलांनी सांगितले की हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून तो महिला सुरक्षेशी संबंधित अजामीनपात्र गुन्हा आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. पीडित पत्रकार वार्तांकनासाठी घटनास्थळी उपस्थित होती आणि तिने स्वतः तक्रार नोंदवली.
दरम्यान, आरोपींच्या वतीने बचाव पक्षाचे वकील प्रताप परदेशी यांनी असा दावा केला की, “बेलबाग चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी इतकी गर्दी असते की पोलिस आयुक्तांनाही धक्काबुक्की होऊ शकते. गर्दीमुळे माझीही पँट फाटली होती. त्यामुळे आरोपींनी केलेली कृती जाणीवपूर्वक नव्हती.” तसेच त्यांनी सांगितले की आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि या प्रकरणामुळे त्यांच्या भविष्यात परिणाम होईल. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील करत आहेत.