पुणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुणेकरांनी यंदा मोठी पावले उचलली आहेत. महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत, यंदा सुमारे १ लाख ७८ हजार ३७६ गणेश मूर्तींचे संकलन आणि दान करण्यात आले. यामुळे नदी आणि जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास मदत झाली आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ६ लाख ५० हजार ४२१ मूर्तींचे विसर्जन झाले, जी गतवर्षीच्या तुलनेत (५,५९,९५२ मूर्ती) वाढलेली संख्या दर्शवते. या आकडेवारीमध्ये शेवटच्या विसर्जन दिवसाची (रविवार) संख्या अद्याप समाविष्ट नाही. महापालिकेने शहरात विसर्जनासाठी ३८ ठिकाणी ६९ हौद, ६४८ लोखंडी टाक्या, ३५ विसर्जन घाट, ३३८ निर्माल्य कलश आणि २४१ मूर्ती संकलन केंद्रे अशी व्यापक व्यवस्था केली होती.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने रचना इतिहास : तब्बल 35 तास चालली मिरवणूक
मूर्ती विसर्जन आणि संकलनाची आकडेवारी
एकूण विसर्जन : ६,५०,४२१ मूर्ती
संकलन आणि दान : १,७८,३७६ मूर्ती (गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ)
६ सप्टेंबर रोजी विसर्जन : ४,४३,३९५ मूर्ती (गेल्या वर्षी ३,७४,१४८ होत्या)
वाढलेले निर्माल्य संकलन
मूर्ती संकलनासोबतच निर्माल्याच्या संकलनातही वाढ झाली आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्तांनी प्लास्टिक आणि थर्माकॉल वगळून केवळ फुले व पाने निर्माल्यामध्ये टाकली.
यंदाचे निर्माल्य संकलन : ८,७६,३८१ किलो
मागील वर्षीचे निर्माल्य संकलन : ७,०६,४७८ किलो