...

मोठा धोका टाळण्यासाठी पुण्यात कोरोनाच्या व्हेरिएंटवर लक्ष केंद्रित

कोरोना विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा मागोवा घेण्यासाठी पालिकेचे पाऊल

पुणे | प्रतिनिधी – पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 62 रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले आहेत. या तपासणीमुळे सध्या रुग्णांमध्ये आढळणाऱ्या विषाणूचा प्रकार, त्याची तीव्रता आणि कोणता व्हेरिएंट आहे हे स्पष्ट होणार आहे. (pune covid cases genome sequencing)

 

 

पुणे मनपामध्ये तब्बल ७३३६ पदे रिक्त ; कामकाजावार होतोय परिणाम !

 

महापालिकेच्या माहितीनुसार, जानेवारीपासून मे २०२५ पर्यंत पुण्यात एकूण १२१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यातील २७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या ९४ रुग्ण सक्रिय आहेत, त्यापैकी १० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून ८४ रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. सुदैवाने, आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणताही रुग्ण गंभीर अवस्थेत नाही, तसेच व्हेंटिलेटरवर देखील कोणी नाही. मात्र, सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेची पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील श्वसनविकाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले जात असून, डॉ. नायडू रुग्णालयात ५० खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. औषधे आणि आवश्यक साधनांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. महापालिकेने नागरिकांना मास्कचा वापर, हातांची स्वच्छता राखणे आणि कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

🧬 काय असते ‘जीनोम सिक्वेन्सिंग’?

जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे एखाद्या जीवाचा संपूर्ण अनुवंशिक कोड (DNA अथवा RNA) तपासण्याची प्रक्रिया. यात त्या विषाणूचे किंवा पेशीचे गुणसूत्र (genes) अणुरूपात तपासले जातात.

 

का करतात जीनोम सिक्वेन्सिंग?

✅ नवीन व्हेरिएंट्स शोधण्यासाठी (उदा. कोरोना विषाणू)

✅ रुग्णाच्या आजाराचा उगम समजून घेण्यासाठी

✅ व्यक्तिनिहाय औषधोपचार नियोजनासाठी

✅ जन्मपूर्व चाचणी व अनुवंशिक आजार ओळखण्यासाठी

✅ संशोधनासाठी आणि औषध निर्मितीमध्ये

 

 

Local ad 1