...

महापालिकेतील महिला अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप – भाजप पदाधिकाऱ्यावर मानसिक छळाची तक्रार

महापालिका, मंत्र्यांकडून किंवा पक्षाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही

पुणे | पुणे महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित अधिकारी थेट त्यांच्या कक्षात घुसून धमकावणे, दरवाजा बंद करणे आणि छायाचित्रण करण्यासारखी कृती केल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे तक्रारीनंतरही महापालिका, मंत्र्यांकडून किंवा पक्षाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. (pune bjp leader harassment complaint woman officer)

 

 

या प्रकरणी तक्रार करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने सुरुवातीला महापालिकेतील अंतर्गत “विशाखा समिती”कडे तक्रार दाखल केली होती. समितीने चौकशी करून अहवाल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला. मात्र, आरोग्य विभागप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी “अहवालच मिळाला नाही” असे सांगत जबाबदारी टाळली. (pune bjp leader harassment complaint woman officer)

 

पुणे मनपामध्ये तब्बल ७३३६ पदे रिक्त ; कामकाजावार होतोय परिणाम !

 

या अधिकाऱ्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र, भाजप पदाधिकाऱ्याविरोधात काहीच कार्यवाही झाली नाही. यामुळे अखेर या महिला अधिकाऱ्याने थेट राज्य महिला आयोग यांच्याकडे तक्रार केली. आयोगाने याची दखल घेतली असून, महापालिकेची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधितांची माहिती घेतली आहे.

 

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आयुक्तांना पत्र पाठवून भाजप पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले,“कोणताही पक्षाचा पदाधिकारी असो, अशा वर्तनाला परवानगी नाही. गरज पडल्यास अशा व्यक्तींचा महापालिकेतील प्रवेश बंद करू.”

 

 

आरोग्य विभागातील अंतर्गत राजकारण आणि गटबाजी?

महापालिकेच्या आरोग्य विभागातील  काही वरिष्ठ अधिकारी गटबाजीत अडकले असून, बाहेरील व्यक्तींना माहिती देण्याचे प्रकार घडत असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही अधिकारी माहिती अधिकाराच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे. सुरक्षा विभागाने संबंधित पदाधिकाऱ्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी, “तो सभा आणि आंदोलनासाठी कार्यकर्ते आणतो, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही,” असा खुलासा दिल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल खचले आहे.

महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वीही जानेवारी महिन्यात लेखी तक्रार दिली होती. विशाखा समितीने दोन महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करून अहवाल आयुक्तांकडे दिल्याची माहिती अंतर्गत समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.(pune bjp leader harassment complaint woman officer)

 

 

 

Local ad 1