(Marathi book) लाॅकडाऊनमध्ये गुदमरलेल्या मराठी पुस्तक विक्रीची सत्य कथा…
कोरोनाची दुसरी लाट आली आणि लॉकडाऊनच्या एका चक्रव्यूहातून बाहेर पडलेला समाज दुसऱ्या चक्रव्यूहात अडकला. फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी ७ ते ११ वेळात उघडी राहणार, ते वगळता सगळा लॉकडाऊन असं अनपेक्षितपणे जाहीर झालं. लोक पुन्हा घरात अडकले. पण या दुसऱ्या चक्रव्यूहात जीवनावश्यक वस्तूंच्या व्याख्येत पुस्तकांचा समावेश झाला नाही. जवळपास संपूर्ण एप्रिल आणि मे पूर्ण महिना पुस्तकांची दुकानं लॉकडाऊन नियमानुसार बंद ठेवण्याचा सरकारी आदेश निघाला. २०२० च्या पहिल्या लाटेच्या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन पद्धतीने पुस्तके मागविण्याची मुभा होती. पण २०२१ च्या लॉकडाऊन ने ती मुभा काढून घेतली. (marathi book)
ऑनलाईन पद्धतीने फक्त जीवनावश्यक वस्तूच मागवता येतील असा दंडक निघाला. पुस्तकांना जीवनावश्यक वस्तू म्हणून मान्यता नसल्याने एप्रिल २०२१ मध्ये पुस्तकांच्या ऑनलाईन ऑर्डर्स महाराष्ट्र राज्यात पूर्ण थांबल्या. पुस्तकांची दुकाने बंद, ॲमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या सेवांकडून पुस्तके ऑनलाईन मागवण्याची सोयही नाही, आणि शक्यतो घरातच थांबा असा लॉकडाऊनी सल्ला यामुळे दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये पुस्तक वाचक-ग्राहकांची बौद्धिक उपासमार सुरू झाली. (marathi book)
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट माध्यमातून मराठी पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्याचे काम आमची संगणक प्रकाशन ही संस्था करते. मराठीतील आघाडीच्या सुमारे १०० हून अधिक प्रकाशकांची पाच हजारांहून अधिक टायटल्स आम्ही ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर आणली आहेत. यात राजहंस, मॅजेस्टिक, मौज, ग्रंथाली, श्रीविद्या, साधना, मेनका, रोहन, पद्मगंधा अशा अनेक नामवंत प्रकाशकांचा समावेश आहे. अखिल भारतातून दररोज शेकडो मराठी पुस्तकांच्या ऑर्डर्स वाचक-ग्राहक ॲमेझॉन व फ्लिपकार्ट माध्यमातून संगणक प्रकाशनकडे पाठवत असतात. एप्रिल २०२१ मध्ये या ऑर्डर्स एकदम शुन्यावर आल्या. कारण पुस्तक ही जीवनावश्यक वस्तू नाही, आणि लॉकडाऊन नियमानुसार छापिल पुस्तकांच्या ऑनलाईन पद्धतीने विक्रीवर बंदी घातली गेली होती.
बिस्कीटे, साबण किंवा फिनाईल ची ऑनलाईन ऑर्डर ॲमेझॉन – फ्लिपकार्ट वर देता येत होती, त्याची महाराष्ट्र भर डिलीव्हरी करण्याची परवानगी होती. पण पुस्तकांची ऑनलाईन ऑर्डर घेण्यावर बंधने आल्याने मूळातच अडचणींतून जिकीरीने मार्ग काढत असलेला मराठी पुस्तक प्रकाशन, विक्री व वितरण व्यवहार एप्रिल २०२१ मध्ये पूर्णपणे ठप्प झाला. लॉकडाऊन मध्ये घरात अडकलेल्या हजारो मराठी वाचकांची पुस्तके दुकानातून व ऑनलाईन मागवण्याची सोय पूर्ण बंद झाली.
आमच्या संगणक प्रकाशनने पुस्तके ही जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकावी, व त्यांचा ऑनलाईन पुरवठा थांबवू नये, अशी विनंतीवजा सूचना करणारी पत्रे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली. त्याची पोचही मिळाली. तुमचे पत्र व सूचना संबंधित विभागाकडे पाठवली आहे असे सरकारी उत्तर मिळाले. पण संपूर्ण एप्रिल व मे महिनाभर पुस्तके जीवनावश्यक वस्तूंच्या यादीबाहेरच राहिली. परिणामी मराठी पुस्तक विक्री व्यवहार दोन महिने बंद राहिला. गंमत म्हणजे या काळात गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश वगैरे राज्यांतील ग्राहकांच्या मराठी पुस्तकांच्या ऑर्डर्स ॲमेझॉन व फ्लिपकार्ट दोघेही स्वीकारत होते. कारण त्या राज्यांमध्ये ऑनलाईन पुस्तकांच्या विक्रीवर बंधने नव्हती. Marathi book
संगणक प्रकाशनकडे त्या राज्यांतील ग्राहकांच्या ऑर्डर्स येऊन पडत होत्या. आम्ही पुस्तके पॅक करून डिलीव्हरी तयार ठेवत होतो, पण ती डिलीव्हरी उचलण्यावर ॲमेझॉन वगैरेंनी निर्बंध टाकले होते. कारण महाराष्ट्रात पुस्तकांची वाहतूक करण्यावर बंधने होती. त्यामुळे गोव्याच्या वा बडोदा, दिल्ली वगैरेंच्या ग्राहकांच्या ऑर्डर्सची डिलीव्हरी पंधरा दिवसांनंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन संपल्यावर होईल असे ॲमेझॉन त्या ग्राहकांना सांगत होते. पण दर वेळी लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढत होता, आणि पुस्तकाच्या डिलीव्हरीची तारीख त्यामुळे आणखी पंधरा दिवसांनी पुढे जात होती. यामुळे शेवटी ज्या वाचक ग्राहकाने आगाऊ पैसे भरून ॲमेझॉन वगैरे वर पुस्तकाची ऑर्डर बुक केली आहे अशांचा धीर खचत होता. तो ग्राहक बिचारा वाट बघून आपली ऑर्डर कॅन्सल करून रिफंड घेत होता.
वाचनाची आवड कमी होत आहे, लोक वाचत नाहीत, पुस्तके खपत नाहीत, वाचन संस्कृतीच धोक्यात आली आहे वगैरे चर्चा आजकाल जोरात चालते. पण वाचन साहित्याची ऑर्डर देणार्या वाचकांना लॉकडाऊन मुळे पुस्तकांपासून कसे वंचित रहावे लागते याचा भयानक अनुभव संगणक प्रकाशनमध्ये काम करणारा मी आणि माझे सहकारी प्रत्यक्ष घेत होतो.
- –विश्वनाथ खांदारे – 9987642793