स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार
आगामी स्थानिक निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने पश्चिम महाराष्ट्रात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून, आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्ष थेट मैदानात उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
५ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद येथे AIMIM पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ओवैसी यांनी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना आगामी स्थानिक निवडणुकांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रदेश सहसचिव शफिउल्ला काझी यांची पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत संघटनात्मक कामे सुरू आहेत. पुणे जिल्हा समन्वयक म्हणून फय्याज शेख, सांगली जिल्ह्यात शाहीद पिरजादे व टिपू इनामदार, कोल्हापूर जिल्ह्यात इम्रान सनदी व इलियास कुन्नुरे तर पुणे शहर समन्वयक म्हणून जुबेर पिरजादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शफिउल्ला काझी म्हणाले की, “महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी व वंचित समाजासाठी AIMIM हा एक खंबीर पर्याय ठरत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली गेल्या ७५ वर्षांत फक्त मतांची राजकारण झाली, परंतु समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले.”
पुढील १०-१५ दिवसांत अहमदनगर, सांगली आणि कोल्हापूर येथे असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभांचे आयोजन होणार असून, या सभांमधून AIMIM ची निवडणूक रणनीती स्पष्ट होईल, असेही काझी यांनी सांगितले.