Lohegaon Airport। लोहगाव विमानतळावर भटक्या श्वानांचा त्रास कायम
महापालिकेने १२ श्वान पकडले
Lohegaon Airport। पुणे : लोहगाव विमानतळावरील भटक्या श्वानांचा त्रास येत्या काळातही कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी प्रवासी भागातून १२ भटके श्वान पकडले. मात्र, महापालिकेच्या नियमानुसार नसबंदी केल्यानंतर पुन्हा त्याच भागात श्वानांना सोडण्यात येणार आहे, त्यामुळे विमानतळ परिसरातूनच त्यांची सुटका होणार आहे. (lohegaon airport stray dogs operation)
गेल्या आठवड्यात धावपट्टीवर भटके श्वान फिरताना दिसले होते, त्यामुळे एक विमान लँडिंग न करताच हवेत थांबावे लागले होते. अशा घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धावपट्टीवर श्वानांच्या वावरामुळे विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळा निर्माण होत आहे.
पुण्यात 2 च अनधिकृत होर्डिंग ? आयुक्तांनाच नाही विश्वास ; तुम्हांला विश्वास आहे का ?
महापालिकेच्या मोहिमेत गुरुवारी पकडलेले श्वान हे प्रवासी क्षेत्रातून होते. धावपट्टी भागातून अद्याप एकाही श्वानाला पकडण्यात आलेले नाही, अशी माहिती मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली. ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासून विमानतळ परिसरात विशेष काळजी घेण्यात आली होती. श्वान पकडणारी गाडी व कर्मचारी विमानतळ परिसरात तैनात होते.
“लोहगाव विमानतळावरील प्रवाशी भागातून महापालिकेने १२ भटके श्वान पकडले आहे. धावपट्टीवरून अद्याप एकही श्वान पकडण्यात आलेले नाही. सध्या हे श्वान महापालिकेच्या ताब्यात आहेत. भटके श्वान पकडण्याची मोहीम सुरु राहणार आहे.”
— डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका