नांदेड : श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त (Srikshetra Malegaon Yatra) जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे कृषि प्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच सन 2021-22 व 2022-23 या वर्षामध्ये कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेट्टे यांनी कळविले आहे. (Grand Agricultural Exhibition in Srikshetra Malegaon Yatra)
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्म सिंचन, कृषी विज्ञान केंद्रामार्फत माती परिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, सेंद्रीय शेती, देशी वाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादी बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बियाणे कंपन्याकडून विविध पिकांचे लाईव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहे. यात्रेचा कालावघी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून कृषिनिष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. या दरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठया प्रमाणात भेटी देतात. उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. (Grand Agricultural Exhibition in Srikshetra Malegaon Yatra)