पुणे : गेल्या काही वर्षांत देशात आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतील रुग्णालयांमध्ये आगीच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. या अग्निकांडांमध्ये (FireSafety) अनेक रुग्णांनी जीव गमावला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि पुणेकरांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी पुणे महानगरपालिकेच्या (PMC) सर्व सरकारी, महापालिका संचालित तसेच खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट (FireAuditPune) अनिवार्य करण्याचे आदेश पुणे मनपाचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. (Fire audit of all hospitals in Pune will be conducted)
शनिवारी आयुक्तपद स्वीकारल्यानंतर, सोमवारी नवल किशोर राम यांनी विविध विभाग प्रमुखांसह आढावा बैठक घेतली. त्यांनी आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता या महत्त्वाच्या विभागांची प्रगती तपासली. आयुक्त राम यांनी याआधी पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले असून, त्यांनी नंतर पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कामगिरी बजावली आहे.
आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, शहरातील सर्व मोठ्या आणि लहान रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन निर्गमन मार्ग, फायर अलार्म सिस्टीम, पाणी आणि वीज पुरवठ्याची सुरक्षितता यांचा समावेश आहे. फायर ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी त्वरित दुरुस्त केल्या जातील. आवश्यक असल्यास रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस किंवा दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
तसेच, नदी सुधार प्रकल्प, जायका अंतर्गत जलपुरवठा योजना, मेट्रो समन्वय आणि रस्ते विकास यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे,” असेही त्यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ही प्रयत्न केले जातील.
फायर ऑडिट का महत्वातचे?
पुण्यात सुमारे ८७० खासगी नोंदणीकृत रुग्णालये, १९ महापालिका प्रसूतीगृह, कमला नेहरू, नायडू रुग्णालय, ससून हॉस्पिटल, औंध जिल्हा रुग्णालय आणि विविध सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे अग्निकांड झाल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याचा धोका असतो. यामुळे रुग्णालयांची अग्निसुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी फायर ऑडिट करणे अत्यंत आवश्यक आहे.
महापालिका प्रशासनाचा आवाहन
आयुक्त नवल किशोर राम यांच्या या निर्णयामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा निर्माण होणार आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनात जबाबदारीची भावना वाढेल आणि भविष्यात अशा प्रकारच्या आपत्ती टाळण्यास मदत होईल. महापालिका प्रशासन नागरिकांना सजग राहण्याचे आणि कोणतीही अग्निसुरक्षा समस्या आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करते.
पुणेवासी माझ्यासाठी केंद्रस्थानी
“पुणे माझ्यासाठी नवीन शहर नाही, कारण मी येथे जिल्हाधिकारी म्हणून पाच वर्षे काम केले आहे. त्यामुळे पुण्याची मला चांगली माहिती आहे. मात्र पुणे मनपा माझ्यासाठी नवीन जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात सर्वसामान्य पुणेकर माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी पूर्ण प्रयत्न करीन,” असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
“शहरातील सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता ही माझी प्राथमिकता आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण आणि कर्मचारी यांच्या जीवितहानी टाळण्यासाठी रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट अत्यंत आवश्यक आहे.”
— नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका