...

महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्यांना ‘मोक्का’खाली कारवाई !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे, राज्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल अधिकारी जेव्हा कारवाईसाठी पुढे सरसावतात, तेव्हा काही मस्तवाल प्रवृत्ती त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. अशा गुन्हेगारांवर आता मोक्का कारवाई केली जाईल, अशी तीव्र आणि स्पष्ट चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (ajit pawar mokka action against attack on revenue officers)

“महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याची मस्ती आम्ही उतरवू. त्यांच्यावर मोक्का कारवाई करून ‘चक्की पिसिंग’ साठी पाठवले जाईल. महायुती सरकार हे कृतीतून सिद्ध करेल,” असे उपमुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. ते पुणे जिल्ह्यात आयोजित महसूल लोकअदालतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार भीमराव तापकीर आदी यावेळी उपस्थित होते.

११ हजार प्रकरणांपैकी ६६६ प्रकरणांचा निपटारा

 प्रथमच झालेल्या महसूल लोकअदालतीत ११,००० प्रकरणांपैकी ६६६ प्रकरणे निकाली काढली गेली. या प्रकल्पाचा विस्तार राज्यभर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. “या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल विभागासाठी १,००० कोटींची पायाभूत गुंतवणूक

महसूल विभागाने अडीच हजार कोटींची बचत केल्यानंतर त्यातील १,००० कोटी रुपये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरले जातील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.पुण्यात लवकरच नवीन पोलिस आयुक्तालय, महसूल भवन, कृषी भवन, कामगार भवन आणि महिला व बालकल्याण भवन उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

पीडित वृद्धाचे ऐकून घेतलं म्हणणं

कार्यक्रमा दरम्यान एक वृद्ध नागरिक व्यासपीठाजवळ येत उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होता. कार्यक्रम संपल्यानंतर पवार स्वतः त्याच्याजवळ गेले, त्याचं म्हणणं ऐकलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

Local ad 1