...

डॉ. दुधभाते नेत्रालयातून लाखो रुग्णांची नेत्रसेवा घडावी : अजित पवार

पुणे, दि. २४ : डोळ्यांमुळे आपण या सुंदर जगाचे दर्शन घेतो, मात्र आजच्या तणावपूर्ण आणि वेगवान जीवनशैलीमुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. मोतीबिंदू, रेटिनाचे आजार, नंबर वाढणे, ड्राय आय सारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डोळ्यांचे उपचार करणारे डॉ. अनिल दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर सिंहगड रोड परिसरात सुरू झाले आहे. या नेत्रालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, “डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून उभे केलेले हे आधुनिक नेत्रालय आज हजारो रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ते गोरगरीब आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नेत्रसेवा देतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गेल्या काही वर्षांत अनेक मोफत शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून लाखो रुग्णांना डोळ्यांचे आरोग्य परत मिळाले आहे. पुढील काळात अधिकाधिक जनतेपर्यंत नेत्रसेवा पोहोचावी, हीच अपेक्षा आहे.”

 

डॉ. अनिल दुधभाते यांनी २०११ मध्ये लहानशा क्लिनिकमधून कार्य सुरू केले. सततच्या मेहनतीतून व रुग्णसेवेतून त्यांनी सिंहगड रोडवर तब्बल १० हजार चौ.फुटांचे तीन मजली आधुनिक नेत्रालय उभारले आहे. या केंद्रात कांटूरा लॅसिक तंत्रज्ञानासह अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. रेटिना शी संबंधित गुंतागुंतीचे ऑपरेशन, कॉर्नियाचे उपचार, नंबर कमी करण्यासाठी लेसर तंत्रज्ञान यांसारखे उपचार एकाच छताखाली करता येतात. गेल्या चार वर्षांत तब्बल ५०० मोफत शिबिरे घेऊन ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. आगामी काळात ‘चेन हॉस्पिटल’ सुरू करण्याची योजना असणार आहे.

 

केवळ व्यवसाय न पाहता ‘आरोग्य सेवा ही समाजसेवा आहे’ या ध्येयाने काम करणाऱ्या डॉ. दुधभाते यांनी मोफत नेत्रतपासणी शिबिरे, ग्रामीण भागातील सेवा, शालेय मुलांच्या नेत्रतपासणी यांसारख्या अनेक उपक्रमांमधून आपली छाप सोडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण पुण्यात उपचारासाठी येतात.

 

 

 

 

 

 

Local ad 1