...

PMC NEWS : पुणे महापालिका ३२ रस्ते आणि २0 चौकातील वाहतूक कोंडी फोडणार

पुणे : पुणे महापालिकेने भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी रस्ते खोदाई शुल्कात मोठा बदल केला आहे. याआधी वीज कंपन्यांकडून प्रतिमीटर ६ हजार ९६ रुपये शुल्क आकारले जात होते, मात्र आता नागपूर महापालिकेच्या धर्तीवर प्रतिमीटर केवळ १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. (pune mahapalika road digging fees 100rs electric pole shift)

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ

 

या खोदाईनंतर रस्ते दुरुस्तीची जबाबदारी संबंधित वीज कंपनीवरच राहणार असून, या दुरुस्तीच्या कामाचा दोष-दायित्व कालावधी ३ वर्षांचा असेल. या निर्णयाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मान्यता दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

 

२०१५ पासून खासगी कंपन्यांसाठी प्रतिमीटर १२ हजार १९२ रुपये शुल्क आकारले जाते. वीज कंपन्यांना त्यावर ५० टक्के सूट देऊन ६ हजार ९६ रुपये शुल्क घेतले जात होते. मात्र आता महापालिकेने धोरण बदलून वीज कंपन्यांसाठी शुल्क फक्त १०० रुपये निश्चित केले आहे.

 

वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल व फिडर पिलर हटणार

शहरातील ३२ रस्ते आणि २० चौकांमधील वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत पोल व फिडर पिलर हटविण्यासाठी महावितरण आणि पुणे महापालिका यांच्यात संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार काही चौक व पदपथांवर महावितरणचे पोल व फिडर-पिलर असल्याने नागरिकांना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी समितीकडे राहणार आहे. महावितरणच्या माहितीनुसार सध्या शहरात पदपथांवर अंदाजे ७० हजार पिलर आहेत. त्यांना बाजूला करण्यासाठी आणि नवीन जागा शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Local ad 1