पुणे, २० सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हडपसरमधील यशस्वी जनसंवादानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दुसऱ्या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जनसंवादात २५ हून अधिक शासकीय विभागांचा सहभाग होता. एकूण ४,८०० तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी १,८०० तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक समस्यांशी संबंधित होत्या. (pimpri ajit pawar jan samvad 2025)
पुण्यात पाणी संकट गडद? पाणी कपात चर्चेला PMC आयुक्तांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी नकार
तक्रारींचे संकलन आणि निवारणासाठी डिजिटल हेल्पलाईन, व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स आणि डिजिटल किऑस्क यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निश्चित झाले. अजित पवार म्हणाले, “पिंपरीकरांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारी काळजीपूर्वक ऐकल्या. स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत अनेक अडचणी त्वरित सोडवल्या. उर्वरित तक्रारी मंत्रालय, संबंधित विभाग आणि खात्यांपर्यंत पोहोचवल्या जातील. प्रत्येक प्रकरणाचा फॉलो-अप करून त्याचे समाधान मिळेल याची खात्री आम्ही करून घेणार आहोत.”
विश्वास दृढ करणारा उपक्रम
हडपसरनंतर पिंपरीत झालेल्या या दुसऱ्या जनसंवादाने नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना एकत्र आणत पारदर्शक व जबाबदार तक्रार निवारणाचे व्यासपीठ दिले. या उपक्रमामुळे लोक आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये विश्वास अधिक दृढ होत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात आले.
पुढील जनसंवाद लवकरच
पिंपरीनंतर लवकरच राज्यातील इतर भागांतही जनसंवादाचे आयोजन केले जाणार असून, लोकांच्या नागरी सेवांशी संबंधित प्रश्नांचे त्वरित व सुलभ निराकरण करण्यासाठी हा सातत्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे.