व्हिडिओ : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर ; विरोधकांना मोठा धक्का !
४१ प्रभागांमधून निवडले जाणार १६५ नगरसेवक
पुणे : तीन वर्षांपासून रखडलेल्या पुणे महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. नगरविकास विभागाकडून तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत आवश्यक सुधारणा करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी प्रारूप रचना अधिकृतपणे जाहीर केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे, प्रदीप चंद्रन एम.जे. आणि उपायुक्त प्रसाद काटकर उपस्थित होते.
आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ च्या जनगणनेप्रमाणे पुणे शहराची लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार २५९ आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार ६३३, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार ६८७ आहे. या आधारावर एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार असून, त्यासाठी ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे.
नगरविकास विभागाच्या नव्या कार्यक्रमानुसार ही रचना ४ सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असून, अंतिम प्रभाग रचना निश्चित वेळेत घोषित केली जाईल. २०१७ च्या प्रभाग रचनेवर मोठा वाद झाल्याची नोंद आहे. यंदाही महायुती सरकार असूनसुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या रचनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वात मोठा आणि सर्वात लहान प्रभाग
या नव्या रचनेत पुणे महापालिका क्षेत्रात समाविष्ट २३ गावे जवळच्या प्रभागांत जोडण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांची संरचना बदलली आहे. यामध्ये क्रमांक ३८ आंबेगाव – कात्रज हा सर्वात मोठा प्रभाग असून त्याची लोकसंख्या १ लाख १४ हजार ९७० इतकी आहे. यात अनुसूचित जातीचे १२ हजार ६९७ आणि अनुसूचित जमातीचे १ हजार ८४६ मतदार आहेत. तर क्रमांक ३९ अपर सुपर – इंदिरानगर हा सर्वात लहान प्रभाग असून त्याची लोकसंख्या ७५ हजार ९४४ आहे. यात १४ हजार ८६५ अनुसूचित जाती व ४६८ अनुसूचित जमातीचे मतदार आहेत.
उपनगरातील प्रभाग क्षेत्रफळाने मोठे, मध्यभागातील लहान
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूपानुसार उपनगरातील बहुतांश प्रभाग क्षेत्रफळाने मोठे, तर मध्यवर्ती भागातील प्रभाग तुलनेने लहान ठरले आहेत. या रचनेवरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे लक्ष या प्रारूपाकडे लागले होते. रचना जाहीर होताच अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. साधारणतः प्रभाग आखताना मुख्य रस्ते, नाले, नद्या या नैसर्गिक व भौगोलिक सीमांचा आधार घेतला जातो; मात्र या वेळी काही प्रभाग नदी व मुख्य रस्ते ओलांडून एकत्रित केल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १३ (पुणे स्टेशन – जयजवाननगर), प्रभाग क्रमांक १५ (मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी), प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर – वाकडेवाडी) या भागांची रचना करताना मुठा आणि मुळा नदी ओलांडून एकत्रित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या रचनेवर आक्षेप नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली असून रचनेत थोडाफार बदल करण्यात आला आहे. उपनगरांमध्ये मात्र प्रभाग क्षेत्रफळाने मोठे ठरले आहेत. यामध्ये प्रभाग क्र. ३३ (शिवणे – खडकवासला), क्र. ३४ (नऱ्हे – वडगाव बु.), क्र. ३८ (आंबेगाव – कात्रज), क्र. ४० (कोंढवा बु. – येवलेवाडी), क्र. ४१ (मोहम्मदवाडी – उंड्री), क्र. १५ (मांजरी बु. – साडेसतरा नळी), क्र. ४ (खराडी – वाघोली), क्र. ३ (विमाननगर – लोहगाव), क्र. १ (कळस – धानोरे), क्र. ९ (सुस – बाणेर – पाषाण) आणि क्र. १० (बावधन – भुसारी कॉलनी) या प्रभागांचा समावेश आहे.
४१ प्रभागांची यादी
१) कळस – धानोरी
२) फुलेनगर – नागपूर चाळ
३) विमाननगर – लोहगाव
४) खराडी – वाघोली
५) कल्याणी नगर – वडगाव शेरी
६) येरवडा – गांधीनगर
७) गोखलेनगर – वाकडेवाडी
८) औंध – बोपोडी
९) सूस – बाणेर – पाषाण
१०) बावधन – भुसारी कॉलनी
११) रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर
१२) छत्रपती शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
१३) पुणे स्टेशन – जय जवान नगर
१४) कोरेगाव पार्क – मुंढवा
१५) मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी
१६) हडपसर – सातववाडी
१७) रामटेकडी – मालवाडी
१८) वानवडी – साळुंखेविहार
१९) कोंढवा खुर्द – कैसरबाग
२०) बिबवेवाडी – महेश सोसायटी
२१) मुकुंदनगर – सॅलबरी पार्क
२२) काशेवाडी – डयस प्लॉट
२३) रविवार पेठ – नाना पेठ
२४) कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ
२५) शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
२६) गुरुवार पेठ – घोरपडे पेठ
२७) नवी पेठ – पर्वती
२८) जनता वसाहत – हिंगणे
२९) डेक्कन जिमखाना – हैप्पी कॉलनी
३०) कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
३१) मयूर कॉलनी – कोथरूड
३२) वारजे – पॉप्युलर नगर
३३) शिवणे – खडकवासला
३४) नऱ्हे – वडगाव बुद्रुक
३५) सनसिटी – माणिक बाग
३६) सहकारनगर – पद्मावती
३७) धनकवडी – कात्रज डेअरी
३८) आंबेगाव – कात्रज
३९) अपर सुपर – इंदिरानगर
४०) कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
४१) महंमदवाडी – उंड्री