व्हिडीओ : रोहन सुरवसे पाटील यांनी घेतली अजीत पवारांची भेट ; राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत?
काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून युवक नेत्याची निर्णायक वाटचाल
पुणे : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पक्षाला अलिकडेच राजीनामा दिला होता. त्या निर्णयानंतर काही काळ सार्वजनिकरीत्या शांत राहिलेल्या सुरवसे पाटील यांनी आता आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजीत पवारांची भेट घेतली आहे. यावेळी पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी महत्वाची भुमिका बजावल्याची चर्चा आहे.
रविवारी बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात, सुरवसे पाटील यांनी व्यासपीठावर अजीत पवारांची भेट घेतली. यावेळी अजीत पवार यांनी त्यांच्या पाठीवर थाप देत “समाजहिताचे कार्य करत रहा”, अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे संकेत अधिक ठळक झाले आहेत.
रोहन सुरवसे पाटील हे युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आणि जाज्वल्य भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, पक्षातील अंतर्गत संघर्ष, दुर्लक्ष आणि संघटनात्मक विसंवादामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या समर्थकांमध्ये ही या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण होते. सुरवसे पाटील आणि अजीत पवार यांच्यात झालेल्या या सार्वजनिक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की, सुरवसे पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. पक्षबदलाच्या हालचाली निवडणूक पूर्व राजकीय समीकरणांनाही महत्त्वाच्या ठरू शकतात.