पुणे : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे यांच्या हस्ते पालखी पूजन करून या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली.
इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेश धारण करून भक्तीमय वातावरण निर्माण केले. विविध अभंग सादरीकरणांमध्ये इ. २ री मधून श्रीवत्स अग्निहोत्री, शौनक अग्निहोत्री, इ. ३ री ध्रुव खेकाळे, इ. ४ थी विभास देशपांडे, इ. ५ वी वेदांत माने, आणि इ. ७ वी रविराज बिरादार यांनी विशेष सादरीकरण केले.
इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ‘पावली’ नृत्यप्रकार सादर केला, तर इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संतांची सजीव भूमिका साकारली. इ. ३ री ते ७ वी च्या विद्यार्थिनींनी टाळनृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
संपूर्ण विद्यालयाने दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. “श्री ज्ञानेश्वर माऊली की जय” च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी शिक्षक, पालक व विद्यार्थी सर्वच भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल धावडे यांनी केले, तर पावली आणि टाळनृत्यप्रकाराचे मार्गदर्शन वंदना कदम यांनी केले.