मोठी बातमी । राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे बार वाजले ; कधी होणार मदतान आणि मतमोजणी
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होत असल्याने राज्यभर निवडणुकीचा माहोल निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (दि. ४ नोव्हेंबर) सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा, टप्पे आणि प्रक्रियेचे तपशील जाहीर केले. या निवडणुका ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणार असून, २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदांचा यात समावेश आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
* मतदारसंघनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध : ७ नोव्हेंबर
* नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात : १० नोव्हेंबर
* नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर
* अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर
* मतदानाची तारीख : २ डिसेंबर २०२४
* मतमोजणी आणि निकाल जाहीर ३ डिसेंबर २०२४
मतदार तपशील आणि पारदर्शकता
मतदारसंघनिहाय याद्या मोबाइल अॅपवर उपलब्ध राहतील. मतदारांना आपल्या नावाची पडताळणी तसेच उमेदवारांची संपूर्ण माहिती मोबाईल अॅपमधून मिळेल. दुबार मतदार संदर्भात आयोगाने कडक उपाययोजना केली आहे. दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह लावले जाईल, संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी करून ते इतरत्र मतदान करणार नाहीत याची खात्री केली जाईल. तसेच दुबार मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येईल.
राजकीय रंग चढणार
निवडणुका जाहीर होताच राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला वेग दिला आहे. स्थानिक प्रश्नांवरून प्रादेशिक नेत्यांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण आणि मतदारयादी सुधारणांबाबतही आयोगाकडून स्पष्टता अपेक्षित आहे.

